अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की त्यात साहित्यबाह्य राजकीय टीका झालीच पाहिजे असे जणू काही समीकरण झाले आहे. या टीकेवर काही बोलू नका कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हीच तर जागा आहे. जर सरकार हिंदुत्ववादी असेल तर मग या साहित्य संमेलनाच्या मंचावरून सरकारविरोधी बोलण्याला अधिकच चेव चढतो. सरकार जर डाव्या पुरोगामी किंवा स्वयंघोषित सेक्युलर लोकांचे असेल तर मग हिंदुत्वाला शिवीगाळ करण्याला प्रोत्साहन मिळते.
त्यामुळे अ. भा. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक, अध्यक्ष यापैकी कोणीतरी या मंचावरून हिंदुत्ववाद्यांना शिव्या दिल्याशिवाय साहित्याचा नाद पूर्ण होतच नाही. हा नाद आहे. थाळीनाद तसा हा गालीनाद!
उद्गीरचे साहित्य संमेलन याला अपवाद कसे असेल? संमेलनाचे उद्घाटक शरद पवार असल्याने त्यांनी जरा संयमाने आडोशाने टीका केली. मात्र संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांना तर शरद पवारांसमोर वैचारिक धुणी धुण्याचा उत्साह होता.
त्यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना ‘छद्मबुद्धी विध्वंसक’ अशी शिवी देऊन टाकली. इतकेच कमी झाले म्हणून की काय कोरोना काळातील त्यांच्या थाळीनादाच्या आवाहनाला एक अतिशय नकारात्मक काळे उदाहरण देऊन आपली शिवी आणखी गडद करण्याचा प्रकार करून टाकला.
काही पुरस्कार परत करण्याची संधी शोधतात तर काही त्यासाठी आधी पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करतात. असे हेतू ओळखण्याइतके शरद पवार चतुर आहेत. त्यामुळे या गालीनादाचे मोल ते करतीलच.
कोरोना हा भीषण रोग भारतात पाय पसरू लागला आणि सामाजिक निर्बंध लादण्याची वेळ येईल असे दिसू लागले. त्यावेळी कोट्यवधींच्या देशात या रोगापासून वाचण्यासाठी काही गोष्टी सामान्य माणसाने पाळाव्या लागतील हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा सामाजिक अर्थात जनता कर्फ्यू घोषित केला होता. लोकांनीच तो पाळायचा होता.
या दिवसभराच्या आत्मनियंत्रणाचा समारोप करताना जे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात सेवा करतात त्यांना बळ देण्यासाठी थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अगदी शरद पवार यांनीही कुटुंबासह थाळीनाद केला होता.
भोपाळसारख्या शहरात कोरोनाबाबत चाचणी करायला गेलेल्या परिचारिकांवर जीवघेणा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधानांचे हे थाळीवादनाचे आवाहन किती योग्य होते हे अधोरेखित झाले होते. पंतप्रधान मोदी यांना इतका प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने अनेकांची पोटदुखी तेव्हापासून जी सुरू झाली ती अजून थांबलेली नाही.
उद्गीर साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी थाळीवादनासाठी पुराणातील एक संदर्भ दिला. ते म्हणाले, ‘थाळी वाजवण्याचे भीषण संदर्भ खरेतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहीत नाहीत. नोंद अशी मिळते की दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये बारा वर्षे पाऊस पडला नव्हता आणि समाज भुकेकंगाल होऊन ‘त्राहिमाम्’ म्हणत सैरावैरा झाला होता.
भुकेकंगालांच्या जरत्कारू टोळ्या अन्नाच्या शोधात बाहेर पडून थाळ्या वाजवत गल्लोगल्ली फिरत होत्या आणि समोरून येणार्या माणसांवर तुटून पडत होत्या. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापट अशी थाळीनादाशी जोडली गेलेली आहे.’
कोरोनातील वैद्यकीय सेवाव्रतींच्या आदरासाठी करण्यात आलेल्या थाळीनादावर टीका करताना आणखी यापेक्षा खालच्या पातळीवर घेऊन जाता येणारच नाही. वैचारिक द्वेषाने पछाडले की माणसे किती रसातळाला जाऊन हीन विचार करतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. मौलाना रूमी यांच्या…
‘एक हजार क़ाबील आदमी के मर जानेसे इतना नुकसान नही होता
जितना, के एक अहमक के साहिबे एख़तियार होनेसे होता है ’
या ओळी उद्धृत करून हे अध्यक्षमहाशय काय मखलाशी करतात पाहा –
‘अर्थ असा आहे की लष्करातली एक हजार सक्षम माणसं नष्ट झाली तरी फारसं नुकसान होत नसतं. मात्र, एखाद्या विदूषकाच्या अधिकारप्राप्तीनंतर जे नुकसान होतं ते मात्र भरून निघणारं नसतं. ‘अहमक’ म्हणजे विदूषक.
सर्कशीत काम करणारा विदूषक इथे अभिप्रेत नाही. विदूषकवृत्तीचा मूढ. ‘साहिबे एख़तिफार’ म्हणजे अधिकारप्राप्ती. समाजाने विदूषकप्रवृत्तीच्या मूढांना अधिकारप्राप्ती करून दिली तर समाजाला असह्य पीडा सहन करावी लागते, असा या म्हणण्याचा रोख आहे.
मौलाना रूमींनी विदूषकांपासून सावध राहण्याबाबत आपल्याला सूचित केलं आहे. ही प्रवृत्ती क्रूर प्रवृत्ती असते असंही त्यांनी सांगितलं आहे.’
म्हणजे सासणे महाशय या देशातील लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या पंतप्रधानांना विदूषक प्रवृत्तीचा मूढ म्हणत आहेत. अहो सासणे महाशय, लोकांनी नरेंद्र मोदींना एकदा नव्हे, दोनवेळा बहुमताचा आकडा वाढवत निवडून दिले आहे.
मोदींनी अगदी ‘मोदी मर जा तू’ असे म्हणणार्यांवरही काही कारवाई केलेली नाही. ते संवादाने जग िंजकत चालले आहेत. क्रूर प्रवृत्ती काय असते हे जरा आणिबाणीत ज्यांचा तुरुंगात छळ झाला आहे त्यांना विचारा.
मोदी पहिल्यांदा बहुमताने पंतप्रधान झाल्याक्षणापासून त्यांची प्रतिमा क्रूर, हुकूमशाह, हिटलर अशी रंगविण्याची जणू स्पर्धाच चालली आहे. मात्र प्रत्यक्ष आलेल्या अनुभवानंतर हे सगळे विद्वानांचे गालीनाद सपशेल नाकारून जनतेने मोदी यांना पुन्हा पुन्हा राज्यांमध्ये, देशामध्ये विजयी केले आहे.
सर्वसाधारणपणे लोक मोठ्या संख्येने जे आचरण करतात त्याच्या विपरित आणि विसंगत आचरण करून, अचकट संवाद बोलून विनोद निर्मिती करतात ते विदूषक असतात. ते मूढ असतात.
मुद्दाम ते विसंगत वागत असतात. तसे कोट्यवधी जनतेच्या पसंतीच्या विसंगत मुद्दाम बडबड करणार्यांना काय म्हणावे हे जनतेलाच विचारावे लागेल. ते कोणा मौलानाला माहीत नसेल कदाचित.
भारत सासणे यांनी चातुर्याने आपल्याला ज्या शिव्या द्यायच्या आहेत त्याला अनुकूल काल्पनिक दंतकथा शोधून त्या सांगत भाषण केले आहे. या देशातील स्वयंघोषित पुरोगाम्यांची एक मोठीच समस्या आहे. त्यांनी रा. स्व. संघ, भाजपा अशा हिंदुत्ववादी संघटनांबाबत एक गाढ गैरसमज घट्ट करून घेतला आहे.
या अंधश्रद्धेतच ते वर्षानुवर्षे जगत आहेत. जगात काय चालले आहे ते न पाहता ही नावे आली की डोळे आणखी मिटून ते शिव्या देत सुटले आहेत.
सामाजिक सन्मान, निवारा, समान सर्वां लाभावा
अन्न, वस्त्र, संस्कार, लाभही समान सर्वां व्हावा
हीच एकता समता, ममता, पथ ऐक्याचा सांधू या
असे म्हणत संघाचे लक्षावधी स्वयंसेवक कसलीही प्रसिद्धी न करता देशात लाखो सेवाकार्ये निरपेक्षपणे करत आहेत.
आपले संपूर्ण जीवन त्यात समर्पित करीत आहेत. आज समाजात मोठे नाव असलेले समाजसेवक आहेत. त्यांच्यापेक्षाही जास्त काम करून या कार्यकर्त्यांचे नावही कोठे नाही. त्यांची ती अपेक्षाही नाही. त्यांनी जिंकला आहे सामान्य माणसांचा विश्वास. हा विश्वास असा आहे की कोणी अध्यक्षपदावरून कोणाला कितीही गालीनाद काढत असला तरी या सामान्य माणसांना माहीत आहे की आपल्या गावात, आपल्या गल्लीत काम करणारा रा. स्व. संघाचा कार्यकर्ता कसा आहे.
त्यामुळे त्यांचा अशा गालीनाद करणार्यांवर विश्वास नाही. परिणाम काहीच होत नाही. आज सगळीकडे स्वार्थ आणि भ्रष्टाचार बोकाळलेला दिसत असताना संघाचे कार्यकर्ते नि:स्वार्थपणे काम करतात हे लोकांना अविश्वसनीय आहे. त्यामुळेच तर आसम, त्रिपुरा, मणिपूर अशा राज्यातही परिवर्तन दिसते आहे.
हे परिवर्तन जितके राजकीय आहे त्याच्या कितीतरी पट अधिक सामाजिक आहे. ते ज्यांना पाहायचेच नाही अशा पोथीनिष्ठ, अंधश्रद्ध स्वयंघोषित पुरोगाम्यांना कसे दिसेल? ते आपली वर्षानुवर्षे पाठ केलेली शिव्यास्तोत्रेच म्हणत बसणार.
विशेष म्हणजे सेवाकार्य करणार्या संघाच्या कार्यकर्त्यांना राजकीय परिवर्तन, पाठबळ याचीही अपेक्षा नाही. केरळमध्ये एकही हिंदुत्ववादी आमदार निवडून येत नाही. पण तेथेही शेकडो सेवाकार्ये अनेक वर्षांपासून चालू आहेत. या कार्यकर्त्यांना ‘पथ ऐक्याचा सांधू या’ ही आस आहे.
त्याला ‘भारत माता की जय’ हा मंत्र जगात सिद्ध करायचा आहे. लढा करून नव्हे, तर प्रेमाने. कोरोनामध्ये मदत करून आणि योगदर्शन करून जगात भारताची मान ताठ झाली तसे.
सध्या भारतातील विरोधी पक्षात एक फॅशन निघाली आहे. कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार करणारे आपले काळे धंदे उघड होऊ लागले की चौकशी करणार्यांवर हिटलरशाहीचा आरोप करून मोकळे व्हायचे.
हेच लोक जिथे सहज शक्य असेल तेथे कालपर्यंत ज्यांना हिटलर म्हणून हिणवत होते, त्यांना स्वत:च्या हाताने सत्तेत मुख्यमंत्रिपदी बसवून मोकळे होतात. अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून जीवनमूल्यांचे ज्ञान देत एखादा साहित्यिक अध्यक्ष थालीनादाचे नाव काढत गालीनाद करू लागतो तेव्हा कोण विश्वास ठेवणार?
पालघरला जेव्हा जैन साधूंची हत्या झाली तेव्हा हे ‘पुरस्कार वापसी गँग’चे लोक कसल्या सेक्युलर पट्ट्या तोंडाला लावून गप्प होते. सतराशे साठ दंतकथांमध्ये भारत सासणे यांना पालघरची दीर्घकथा आठवलीच नाही हे विशेष! काल्पनिक कथेतील थाळी घेऊन भीक मागणारे सासणे यांना आठवले.
मात्र, कोरोनात ऑक्सिजनअभावी नाशिकला तडफडून मेलेले आठवले नाहीत? पुण्यात ऑक्सिजन अभावी मरण पावलेला पांडुरंग नावाचा पत्रकार आठवला नाही? काहीही झाले तरी फक्त हिंदुत्ववादी पंतप्रधानांना शिव्या देण्याचा पण केला होता की काय?
वैचारिक टीका जरूर करावी. गेल्या सात वर्षांत अशी टीका करण्याची मोकळीक आहेच. ही मोकळीक दिली नाही, कोठेही टीका केल्याबद्दल कोणी विरोध केला असे एकही उदाहरण नाही.
मात्र तरीही टीका करण्याचे स्वातंत्र्य नाही अशी ओरड केली जात आहे. ज्या व्यासपीठावरून भारत सासणे ही टीका करीत होते त्याच मंचावरचे उद्घाटक शरद पवार यांचे काय? महाविकास आघाडी सरकारवरच्या टीकेला त्यांनी कसे स्वीकारले?
त्यांनी ‘महाविकास आघाडी सरकारवर टीका करणार्या अर्णब गोस्वामी याला आवरा’ असे सुचविल्याचे आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात लिहून जाहीर केले आहे. टीका करणार्यांना आवरा असे सांगितल्यानंतर अर्णव गोस्वामी याला, अतिरेक्याला अटक करावी तसे कसलीही नोटिस न देता घरी कमांडो घेऊन जाऊन अटक करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने सरकारला चपराक देत त्यांची सुटका केली.
त्याच शरद पवार यांच्या उपस्थितीत हे महाशय मोदी यांना विदूषक, विध्वंसक म्हणतात आणि तेच शरद पवार आपल्या भाषणात देशात हिटलरशाही येत असल्याचे तितकेच निर्ढावलेपणाने सांगतात! व्वा रे व्वा!
अशा प्रकारच्या विरोधाभासाने आणि विसंगतीने जनतेचा आता प्रसारमाध्यमांवरचा आणि साहित्यिकांवरचा विश्वास उडत चालला आहे. जनतेच्या मनात काय आहे याचा अंदाज ना साहित्यिकांना येत आहे ना प्रसार-माध्यमांना येतो आहे. त्यामुळेच निवडणूकपूर्व अंदाज वारंवार सपशेल खोटे ठरत आहेत.
साहित्यिक म्हणून मान मिळायचा असेल, पुरस्कार मिळायचे असतील तर िंहदुत्ववादी चळवळ, संघटना, सरकारे यांच्यावर जितकी खालची पातळी गाठणे शक्य असेल तितकी गाठून टीका करणे अनिवार्य झाले आहे. कोणताही कार्यक्रम असो, कोणतीही भूमिका असो तेथे आपली वैचारिक गाठोडी सोडायची आणि ती धुणी धुण्याचा कार्यक्रम करत पाणी गढूळ करून टाकायचे हाच यांचा एकमेव धंदा झाला आहे.
अर्थात परिणामशून्य कापूसकोंड्याची दीर्घकथा भारत सासणे यांच्यासारखे साहित्यिक स्वत:च्या फायद्यासाठी, समाधानासाठी सांगत असतात हे आता सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
सौजन्य : दिलीप धारूरकर
दैनिक तरुण भारत, नागपूर