Balasaheb Thorat and Ashok Chavan News : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेले वृत्त खोटे, खोडसाळ आणि जनतेची दिशाभूल करणारे आहे.
अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये आहेत. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही एकत्र काम करत आहोत. भारत जोडो यात्रेच्या नियोजनात अशोक चव्हाणही सक्रिय आहेत.
अशोक चव्हाण मित्राच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथे एका राजकीय नेत्याची भेट झाली. मात्र त्या भेटीचा ‘गैर’अर्थ काढणे योग्य नाही. महाराष्ट्रात काँग्रेसला मजबूत करण्याचा आमचा निर्धार आहे.
अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा संदर्भ घेऊन मीडियाने जबाबदारीने वार्तांकन करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भात चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. प्रसारमाध्यमांनी हे थांबवण्याची विनंती आहे, असेही थोरात म्हणाले.