मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी काल (दि.1 मे) औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही तर 4 तारखेला सर्वत्र हनुमान चालीसा ऐका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
आता राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेची चौकशी सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा अभ्यासही सुरू झाला आहे. काल रात्रीपासून पोलिस अभ्यास करत आहेत आणि भाषणातील मुद्दे, गर्दी, आवाजाची मर्यादा याबाबत स्थानिक पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या 16 अटींपैकी किती अटींची पूर्तता करण्यात आली आणि किती अटींचे उल्लंघन करण्यात आले, याचा तपास सुरू आहे. अटींचे उल्लंघन झाल्यास काय करायचे याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेतील कालच्या भाषणाचा व्हिडिओ तपासणार असल्याचं गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. ४ मेच्या अल्टिमेटमबाबत उद्या मुंबईत पोलिस अधिकाऱ्यांची बैठक होणार असून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे गृहराज्यमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. धमक्या देणे योग्य नसल्याचेही वळसे पाटील म्हणाले.
राज ठाकरेंचा इशारा
महाराष्ट्राला दंगली नको आहेत. मुस्लिम समाजानेही हे समजून घेण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंनी म्हटले आहे. लाऊडस्पीकर हा सामाजिक प्रश्न आहे, धार्मिक नाही. लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर जर तुम्ही धार्मिक विषय समजत असाल तर आम्हाला धर्मानेच उत्तर द्यावे लागेल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, महाराष्ट्रातली शांतता आम्हाला बिघडवायची नाही, इच्छाही नाही आणि गरजही नाही असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
देशातील हिंदु बांधवांना विनंती आहे, मागचं पुढचं काही बघू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. सरसकट सगळ्या धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढले पाहिजेत. अभी नही तो कभी नाही, हिंदु बांधवांना विनंती आहे, तीन तारखेपर्यंत हे ऐकले नाहीत तर चार तारखेला सगळीकडे हनुमान चालिसा ऐकू आलीच पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले आहे.