भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर पंकजा मुंडे यांनी अवघ्या 30 सेकंदांचं भाषण केलं, यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद : भाजपने 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतल्या. नड्डा यांच्या दौऱ्यात पंकजा मुंडे यांच्या नाराजीची चर्चा रंगली.
जेपी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचे नाव नव्हते, औरंगाबाद दौऱ्यात पंकजा मुंडे अवघे 30 सेकंद बोलल्याने पुन्हा एकदा ‘चर्चांना’ उधाण आले.
पंकजा मुंडे यांचे 30 सेकंदांचे भाषण
औरंगाबादेत जेपी नड्डा यांच्या सभेला उशीर झाल्याने पंकजा मुंडे यांना 2 मिनिटे देण्यात आली. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना अधिक वेळ द्यावा यासाठी अतिशय छोटेखानी भाषण केले.
पक्षाचा आदेश पाळणे ही माझी संस्कृती असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. या भाषणात पंकजा मुंडे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत भाजपला विजयी करण्याचे आवाहन करून भाषणाची सांगता केली.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
या भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘निमंत्रण पत्रिकेत माझे नाव असण्याचे कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, त्यामुळे मी नाराज आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.
वेळ कमी असल्याने आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे भाषण महत्त्वाचे असल्याने मला कमी वेळ देण्यात आला असे म्हणणेही चुकीचे आहे,’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
लोकांमध्ये समज गैरसमज निर्माण होऊन दुफळी निर्माण होते. राजकीय नेत्यांनी शक्यतो महापुरुषांबद्दल बोलणे टाळावे. सर्व महापुरुषांच्या नशिबी संघर्ष होता, अशी पुस्ती पंकजा मुंडे यांनी जोडल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
पंकजांची विधानसभेची तयारी
‘मी राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. मी विधानसभेचीही तयारी करत आहे. आगामी निवडणुका नेत्यांसाठी सोप्या आणि मतदारांसाठी कठीण आहेत,’ असे सांगत पंकजा मुंडे यांनी राज्यात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.