राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार : संभाजीराजेंचे पोस्टर व्‍हायरल

कोल्हापूर : संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार म्‍हणून पाठिंबा देण्‍यास शिवसेनेने नकार दिल्‍यानंतर मराठा संघटनांसह आणि संभाजीराजे समर्थकांमध्‍ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

याच धर्तीवर आता ‘राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार’ अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्य निर्मिती’ अशा ओळी असणाऱ्या या पोस्टरच्या माध्यमातून संभाजीराजे २०२४ ची निवडणूक लढवणार असल्याचेही सूचित केल्याची चर्चा साेशल मीडियावर रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडे असणाऱ्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल चर्चेला ऊत आला होता. संभाजीराजे यांनी पक्ष प्रवेश करावा, असे आवाहन शिवसेनेने केले हाेते.

संभाजीराजे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेशास नकार देत राज्‍यसभा निवडणूक अपक्ष म्‍हणून लढविणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

मंगळवारी (दि.२४) रोजी शिवसेनेने काेल्‍हापूरचे जिल्‍हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली.

छत्रपती संभाजीराजेंना डावलले गेल्यामुळे मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांच्यातून निराशेचा सुरु उमटू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे समर्थकांकडून एक पोस्टर शेअर केले जात असून यामध्ये संभाजीराजें आता महाराष्ट्र काबीज करण्यासाठी २०२४ ची निवडणूक लढवणार, अशा संदेश दिला आहे. आता संभाजीराजेंची पुढील भूमिका काय असणार याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे.