News Bulletin : बूस्टर डोस घेणे कोणालाही बंधनकारक नाही आणि देशविदेशातील मुख्य 20 बातम्या

News Bulletin: No one is required to take booster dose and top 20 news from home and abroad

News Bulletin : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं, केरळ, महाराष्ट्र, मिझोराम, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांना, कोविड प्रसारावर लक्ष ठेवण्याचं आणि तो होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे.

या राज्यांमध्ये गेल्या आठवड्यातल्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली होती, या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिलं आहे. वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवण्याचे त्याचप्रमाणे आवश्यक ते उपाययोजना करण्याचे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत.

****

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाईसाठी केलेल्या दाव्यांची फेरतपासणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक, महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये पाठवलं जाणार आहे. हे पथक जवळपास ५ टक्के दाव्यांची फेरतपासणी करणार आहे.

****

पोषणतत्वांची वाढ केलेल्या तांदळाचं प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. सार्वजनिक वितरण प्रणाली, एकात्मिक बालविकास सेवा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण, प्रधानमंत्री पोषण आणि इतर योजनांच्या माध्यमातून, या तांदळाचं वितरण केलं जाणार आहे.

****

सातारा इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी गटातला अंतिम सामना पुण्याचा हर्षद कोकाटे आणि कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत हर्षद कोकाटेनं हर्षवर्धन सदगीर याचा, तर दुसर्या उपांत्य फेरीत पृथ्वीराज पाटीलनं बीडच्या अक्षय शिंदेचा पराभव केला.

माती गटातला अंतिम सामना मुंबईच्या विशाल बनकर आणि वाशिमच्या सिकंदर शेख यांच्यात होणार आहे. उपान्त्य फेरीत सिकंदर शेखनं अमरावतीच्या माऊली जमदाडेचा, तर विशाल बनकरनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला.

****

थायलंड ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेत सात भारतीय खेळाडुंनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. अमित पंघाल, अनंत प्रल्हाद, सुमित या तिघांसह आशीष कुमार, मोनिका, गोविंद साहनी आणि वरिंदर सिंह या स्पर्धेत विविध वजनी गटात सुवर्णपदकासाठीचे सामने खेळणार आहेत.

****

देशातल्या १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर घेण्याची सुविधा उद्या १० एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

बूस्टर डोस घेणं कोणासही बंधनकारक नसून, तो घेणं पूर्णपणे ऐच्छिक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लाभार्थी, ज्यांनी लसीची दुसरी मात्रा घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, असे नागरिक बूस्टर डोस घ्यायला पात्र असतील, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरु असलेला मोफत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम तसाच सुरु राहील, असं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतल्या घरावर काल झालेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलनाची माहिती माध्यमांना आधी मिळाली, मग ते पोलिस यंत्रणेला का कळलं नाही, असं ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली असून, यामागे कोण आहे याचा पोलीस शोध घेत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे, हे पोलिसांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या या अपयशाची चौकशी व्हायला हवी, असं ते म्हणाले.

****

देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, ॲनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं एका कृती गटाची स्थापना केली आहे. हा कृतीगट भारतीय बाजारात क्षमता निर्माणाचे विविध उपाय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी करायच्या उपाययोजनांसंदर्भात सल्ला देणार आहे.

देशाकडे या क्षेत्रात मार्गदर्शन करण्याची क्षमता असून ४० अब्ज डॉलरच्या आंतरराष्ट्रीय बाजारात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन प्रतिवर्षी १ लाख ६० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील असंही सरकारनं म्हटलं आहे. या कृतीगटात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्य सरकार आणि राष्ट्रीय शिक्षण संशोधन परिषद आणि विविध उद्योगांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.

****

साहित्य क्षेत्रात मानाचा समजल्या जाणाऱ्या यंदाच्या बुकर या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी भारतातल्या हिंदी कादंबरीकार गीतांजली श्री यांना मानांकन मिळालं आहे. बुकर पुरस्कार समितीनं नुकतीच २०२२ या वर्षासाठीची मानांकन यादी जाहीर केली. यात श्री गीतांजली यांच्या रेत समाधी या कादंबरीच्या इंग्रजी भाषेत अनुवादित द टॉम्ब ऑफ सँड या पुस्तकासाठी, त्यांना आणि कादंबरीच्या अनुवादक डेसी रॉकवेल यांना मानांकन जाहीर झालं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकास कामांना चालना देणारा तसचं कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष असल्याचं, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात ते काल बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खुंटेफळ साठवण तलावाचं काम लवकरच सुरू होईल त्यामुळे मतदारसंघाला शाश्वत पाणी मिळणार असल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या अधिष्ठातापदी सोलापूरच्या डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौरे यांनी काल याबाबतचं परिपत्रक जारी केलं.

****

धुळे शहरातल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी ६० पोलिसांना विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक प्रशिक्षण केंद्रातल्या पोलिसांना उलट्यांचा त्रास सुरु झाला, त्यानंतर त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. विषबाधा झालेल्या पोलिसांमध्ये कोणाची ही प्रकृती गंभीर नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विषबाधा नेमकी कशी झाली, याचा शोधही घेतला जात आहे.

****

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना आज संध्याकाळी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईच्या विशाल बनकर यांच्यात होणार आहे.

गादी गटातल्या अंतिम लढतीसाठी पृथ्वीराज पाटील यानं हर्षद कोकाटेचा पराभव केला, तर माती गटातल्या अंतिम लढतीत विशाल बनकरनं वाशिमच्या सिंकदर शेखचा पराभव केला.

****

भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या महिला हॉकी प्रो लीग स्पर्धेनं भारतानं नेदरलँडचा दोन – एक असा पराभव केला. भारतीय संघातल्या नेहा आणि सोनिका या खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. या विजयामुळे भारत १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

****

देशातल्या प्रत्येक प्रौढ नागरिकाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा ऐच्छिक बूस्टर घेण्याची सुविधा उद्या १० एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मात्र ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. बूस्टर डोस घेणं कोणासही बंधनकारक नसून, तो घेणं पूर्णपणे ऐच्छिक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लाभार्थी, ज्यांनी लसीची दुसरी मात्रा घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, असे नागरिक बूस्टर डोस घ्यायला पात्र असतील असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरु असलेला मोफत कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम तसाच सुरु राहील. या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना पहिली आणि दुसरी मात्रा, तर आरोग्य कर्मचारी, आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना वर्धक मात्रा, विनामूल्य दिली जाईल असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. उन्हाळा आणि सिंचनासाठी राज्यातल्या विजेची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पॉवर एक्सचेंजमध्ये उपलब्ध होणारी वीजही महागडी ठरू लागल्यानं, वीज खरेदी करार करण्यासंदर्भात आवश्यक तो निर्णय, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालक मंडळाला घेता येईल, असा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

आपल्या मागण्यांसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. संतप्त आंदोलकांनी पवार यांच्या निवासस्थानावर चप्पलफेक, दगडफेक आणि बांगड्या फेकून आपला निषेध व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना वारंवार शांततेचं आवाहन करत, चर्चेची तयारी दर्शवली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं.

पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून, याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर तसंच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची सूचना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केली आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांविरोधात तसंच चिथावणी देणाऱ्यांविरोधात कडक कारवाईच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेचा निषेध करत, ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं म्हटलं आहे. काही मतभेद असतील, तर चर्चेतून मार्ग निघू शकतो. मात्र वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत जरब बसेल, अशी कठोर कारवाई करावी, असं पटोले म्हणाले.

विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची निंदा करत, नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलनं आजिबात समर्थनीय नसल्याचं, ते म्हणाले. गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे आणि योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला जे अनिष्ट वळण लागलं, ते अनुचित असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत बोलताना, या आंदोलनामागे महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं, म्हटलं आहे.

दरम्यान, पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या सुमारे १०४ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं, मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं आहे. एस टी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १३० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७४ हजार ९४८ झाली आहे. या संसर्गानं काल चार रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ८१० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १४२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २६ हजार ३२६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

कार्डविरहीत पैसे काढण्याची सुविधा, आता सर्व बँकांच्या एटीएम मध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएम मधूनही कार्डशिवाय पैसे काढता येतील. यामुळे बनावट कार्ड तयार करुन त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार कमी होतील, अशी आशा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. ते काल बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केल्यानंतर बोलत होते. ग्राहकांना अधिकाधिक गृहकर्ज मिळावं यासाठी जोखीम निर्धारणाची व्यवस्था पुढच्या मार्च अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.

रिझर्व्ह बँकेनं आपल्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर चार टक्के, तर रिर्व्हस रेपो दर तीन पूर्णांक ७५ टक्के इतका कायम ठेवण्यात आल्याचं दास यांनी सांगितलं. देशात महागाई दर वाढीचा अंदाज असून, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये किरकोळ महागाई दर पाच पूर्णांक सात टक्के असण्याची शक्यता, दास यांनी वर्तवली. शेअर बाजारात अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.

****

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष सय्यदभाई यांचं काल दुपारी पुण्यात निधन झालं. हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष राहिलेल्या सय्यद भाई यांना केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सय्यद भाई यांनी तिहेरी तलाकसह मुस्लिम समाजातल्या इतर अनिष्ट प्रथांविरोधात लढा दिला होता. जात, धर्म नाही तर मानवता हाच खरा धर्म असल्याचं त्यांनी सांगितलं. दगडावरची पेरणी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

****

साखरेसोबत उपपदार्थांच्या उत्पादनावर साखर कारखान्यांनी लक्ष केंद्रीय करण्याचं आवाहन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात येडेश्वरी साखर कारखान्याच्या, डिस्टीलरी म्हणजे आसवणी प्रकल्पाचं उद्घाटन, काल पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाण्याचा अंदाज घेऊन योग्य वाणाचं ऊस उत्पादन घ्यावं, मागच्या पिढीने स्थापन केलेल्या संस्था निगुतीने चालवाव्यात, असं सांगतानाच, राज्यात वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू असल्याची टीका, अजित पवार यांनी यावेळी केली.

****

अजित पवार बीड जिल्ह्यात येऊन शिल्लक ऊसाला तसंच इथल्या शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान, मदत जाहीर करतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी फक्त त्यांनी टीकाच केली, शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल अंबाजोगाई इथं ऊस परिषदेत बोलत होत्या. आपल्या भागाचं मागासलेपण घालवायचं असेल तर शेतीवर आधारित उद्योग आले पाहिजेत, आधुनिक पद्धतीने कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळणारी शेती झाली पाहिजे, असं मुंडे यावेळी म्हणाल्या.

****

औरंगाबाद शहर आणि जर्मनी मधल्या इंगोलस्टॅट शहरात काल ट्वीन सिटी धोरणानुसार सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅट या दोन शहरात, शिक्षण, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, उद्योग, पर्यटन, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात भागिदारीच्या संधी निर्माण होतील.

शहरांमध्ये स्टुडेंट एक्सचेंज प्रोग्रॅम, औद्योगिक भागीदारी, पर्यटन यांना चालना मिळेल, असा विश्वास, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला.

****

बीड जिल्ह्याच्या काही भागात काल अवकाळी पाऊस झाला. अंबाजोगाई तालुक्यात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. पोखरी शिवारात काल सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. शेतातून काम करून घरी परतत असलेल्या या महिलांपासून काही अंतरावर वीज कोसळल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

उस्मानाबाद शहर आणि परिसरात काल संध्याकाळी अर्धा ते पाऊण तास विजांच्या कडकडाटासह पाउस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून तात्पुरती सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सातारा शहर आणि जिल्ह्याच्या कोरेगाव, खटाव तालुक्याच्या विविध भागात काल दुपारी चारनंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाउस झाला. खटाव तालुक्यातील नेर इथं वीज पडून दोन शेळ्या दगावल्या.

दरम्यान, सातारा इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कालचे सामने अवकाळी पावसामुळं रद्द करावे लागले.

****

महसूल सहायक पदाची भरती करण्यात यावी, तसंच प्रलंबित अव्वल कारकून ते नायब तहसीलदार पदोन्नती तत्काळ करण्याच्या मागण्यांसाठी, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातल्या महसूल विभागातले कर्मचारी काल सलग पाचव्या दिवशी संपावर आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहणार असल्याचा इशारा महसूल संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष परेश खोसरे यांनी दिला आहे.

****

राज्यातल्या विविध यात्रांसाठी उस्मानाबाद आगारातून एसटीच्या ९० जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. उस्मानाबाद आगारातून २५, उमरगा आणि परंडा स्थानकातून प्रत्येकी ५, भूम १५ तसंच तुळजापूर आणि कळंब या आगारातून २०-२० जादा गाडया सोडण्यात येतील. प्रवाशी आणि भाविकांची गर्दी विचारात घेवून पंढरपूर, शिंगणापूर, तुळजापूर आणि येरमाळा याशिवाय अन्य ठिकाणीही जादा बसेसची सोय करण्यात आल्याचं विभाग नियंत्रकांनी कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या लासुरच्या देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाला काल कांकण बांधून प्रारंभ झाला. मुख्य यात्रोत्सवाला २१ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून, तीन मे रोजी या यात्रोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्त मंडळानं दिली आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा हा यात्रोत्सव होत असून १६ एप्रिलला ध्वज, पताका आणि काठी मिरवणूक १९ एप्रिलला देवीचे वस्त्रालंकार आणि ओटी भरण्यात येणार आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं खोलेश्वर महाविद्यालयात काल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचं साहित्य संमेलन पार पडलं. हे महाविद्यालय यंदा स्थापनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. या निमित्ताने सहा सत्रात झालेल्या या संमेलनाला ग्रंथ दिंडीने प्रारंभ झाला.

विविध संत, महंत, समाजसुधारक, वारकरी यांच्या पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी, प्राध्यापक तसंच साहित्यिक या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. साहित्य संमेलन सभागृह परिसरात सेल्फी पॉईंट तसंच मराठीतून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भित्तीपत्रं तसंच चित्र प्रदर्शनही भरवण्यात आली होतं.

****

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल सुमारे १९ लाखाचा गुटखा जप्त केला. इंदोरहून कर्नाटककडे गुटखा घेऊन जाणारा एक टेंपो जालना इथं पोलिसांनी ताब्यात घेतला. १८ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह टेंपो, असा एकूण ३५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रक चालकासह अन्य दोघांविरुध्द कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.

****

रमजान महिना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रामनवमी या सणासुदीच्या मुहूर्तावरच, परभणीत महावितरण कंपनीनं सुरु केलेल्या जाचक भारनियमनाच्या विरोधात, काल आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रविण अन्नछत्रे यांना घेराव घातला. यावेळी मोठ्या संखेनं शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

****