मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविरोधात 72 तासांच्या आत पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही ट्वीटच्या (Jitendra Awhad Tweet) माध्यमातून केला आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. आपल्याविरोधातील अत्याचाविरोधात लढा देणार असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं होतं.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
जितेंद्र आव्हाड यांच्यावर काय आरोप?
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता.
चाणक्य नाही शकुनि मामा … शिंदे साहेब जपून रहा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 13, 2022
त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनीधक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यानी मला न्याय द्यावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याच्यावतीने करण्यात आली आहे.
या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आले आहे. त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. आपल्यावर दाखल केलेलला गुन्हा खोटा असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांना नुकताच जामीन मिळाला होता. विवियामा मॉलमधील मारहाणप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक केली होती.
त्यानंतर शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला होता. हर हर महादेव सिनेमाचा शो जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला होता. या सिनेमात दाखवण्यात आलेल्या इतिहासावर त्यांनी आक्षेप नोंदवला होता.
शनिवारी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी अखेर आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे ट्वीट करत जाहीर केले आहे.