नांदेड : नांदेड जिल्ह्यात एका १९ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. मुदखेड तालुक्यातील आमदुरा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रकांत शंकर पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
चंद्रकांत २९ एप्रिल रोजी बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह गावातील झाडीत आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत २९ एप्रिल रोजी घरातून किराणा सामान आणण्यासाठी निघाले होता. मात्र तो घरी परतलाच नाही. रात्री उशिरापर्यंत चंद्रकांत घरी न परतल्याने नातेवाईक व मित्रांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.
अखेर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेऊन चंद्रकांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तेव्हापासून पोलीस चंद्रकांतचा शोध घेत होते. दरम्यान, पाच दिवसांनंतर मंगळवारी (3 मे) चंद्रकांतचा मृतदेह गावातील झुडपात आढळून आला.
अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला असल्याचे दिसून आले. याप्रकरणी चंद्रकांतचे वडील शंकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. दरम्यान, चंद्रकातच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.