संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा सत्कार
उदगीर (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी) : जाणकार समीक्षकांनी माझ्या लेखनाची समीक्षा केली नाही याची खंत आहे; पण वाचकांनी मात्र सदैव साथ दिली, याचा आनंद-समाधान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी केले.
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात छत्रपती शाहू सभागृहात डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ येथे आयोजित लेखक-प्रकाशक सत्कार कार्यक्रमात गवाणकर बोलत होत्या.
संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते गवाणकर आणि प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तूरकर, संमेलनाचे समन्वयक रमेश अंबरखाने नाशिकचे विश्वास ठाकूर उपस्थित होते.
40 वर्षांचा लेखन प्रवास गवाणकर यांनी मनोगतात मांडला. त्या म्हणाल्या, लेखन प्रवासातून अनेक माणसे जोडता आली. मला कथा, कांदबरी लेखन नाही करता आले पण चरित्र लेखन भरपूर केले.
भ्रमिष्टावस्था दूर करण्याची जबाबदारी लेखकांनी पार पाडावी : राजन गवस यांची अपेक्षा
यातून मला स्वतःला घडवता आले. तसेच मोठया लेखकांचे जीवन चरित्र साहित्यामध्ये उमटावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘एक होता कार्व्हर’ या माझ्या पहिल्या लेखनास अनेक मोठया साहित्यिक, लेखक यांचा प्रतिसाद मिळाला हे माझे भाग्य आहे.
सूर्यवंशी यांनी सांगितले की, पुस्तकाचे गाव करण्याप्रमाणे गाव तेथे ग्रंथालय केले जावे. सासणे म्हणाले, साहित्याला वाचकांची, वाचनाची ताकद असणे गरजेचे आहे. बसवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर प्रशांत वाघमारे यांनी आभार मानले.