उदगीर : (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी) । लक्ष्मीबाई टिळक, शांताबाई शेळके यांच्या पासून सिंधूताई सपकाळ तसेच बालकवी यांच्यापासून पु. ल. देशपांडे यांच्या वेशभूषेत नटलेली बालके आपापसात साहित्यिक चर्चा करत होती. निमित्त होते ते 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालमेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याचे!
बालसाहित्यिक आणि असंख्य बालकांच्या किलबिलाटात प्रसिद्ध लेखिका तथा अनुवादिका वीणा गवाणकर यांच्या अध्यक्षतेत दीपप्रज्वलनाने या बालमेळाव्याचे उद्घाटन नथमलशेठ इन्नाणी सभागृहात झाले.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, उषा तांबे, ज्येष्ठ लेखक दासू वैद्य, साहित्य संमेलनाचे प्रमुख समन्वयक दिनेश सास्तूरकर, रसूल पठाण, प्रभाकर साळेगावकर, बालकुमार मेळाव्याच्या समन्वयिका डॉ. स्मिता लखोटिया, धनंजय गुडसूरकर आदी व्यासपीठावर होते.
मान्यवरांच्या हस्ते झिरमिळ्यांचे फटाके फोडून अनोख्या पद्धतीने या दालनाचे उद्घाटन झाले. बालकांना आकर्षित करणारे रंगीबेरंगी फुगे, व्यासपीठाभोवती रंगीबेरंगी मोठ्या मोठ्या पेन्सिलिंचे कुंपण, टेडीबेअर, ठिकठिकाणी फुललेला फुलांचा ताटवा अशा सुशोभीकरणाने बालकच नव्हे तर मोठ्यांनाही भुरळ पाडली. या मेळाव्याला बालकुमारांची अलोट गर्दी होती.
सभागृहाच्या प्रवेशद्वाराशी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा जीवंत देखावा आणि शिक्षणाची बाराखडी दर्शविणारा फलक असे विविध आकर्षणबिंदू या बालमेळ्यात पहायला मिळाले.
सभागृहाच्या प्रवेशद्वारात रंगीबेरंगी फुगे आणि रंगीत झिरमिळ्यांचे फटाके फोडल्या नंतर बालकुमारांच्या उत्साहाला अधिकच उधाण आले. दरम्यान ‘बालरंग’ या साहित्य संमेलनाच्या विशेषांकाचे प्रकाशन कौतिकराव ठाले पाटील, भारत सासणे, उषा तांबे, दासू वैद्य, दिनेश सास्तूरकर, रसूल पठाण, प्रभाकर साळेगावकर, संपादक श्रीनिवास नार्वेकर, पृथ्वीराज तौर, रामप्रसाद लखोटीया आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
बालकांचे मनोविश्व रेखाटणाऱ्या कविता
बालकवी राजवर्धन पाटील याच्या ‘आई राबते घरात, आई राबते रानात, जरी दुःख उरात, तरी आनंदी सुरात’ या कवितेने सभागृहाला ‘आई’च्या मायेची, छायेची, त्यागाची आठवण करण्यास भाग पाडले. तर ॠतुजा मगरच्या ‘वाटण्या आई वडिलांच्या’ या कवितेतून आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीवर प्रकाश टाकला गेला.
बालकांचं मनोविश्व किती छोट्या छोट्या गोष्टींनी प्रभावित होतं याचे दाखले देणारे अनेक विषय बालकविंच्या सादरीकरणातून समोर आले.
बालमेळाव्याच्या उद्घाटनानंतर झालेल्या बालकविंच्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक रसूल पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरूके उपस्थित होते.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे, शिल्पा बनसोडे यांच्या हस्ते बालकवींना सहभाग प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या संमेलनात सादरीकरणासाठी एकूण 400 कवितांची नोंदणी झाली होती. त्यातील 44 कवितांची निवड तीन परिक्षकांच्या परीक्षणानंतर करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केले तर आभार स्मिता मेहेकरकरयांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी रामदास केदारे, विजयालक्ष्मी गारठे, तृप्ती मुंदडा आदींनी परिश्रम घेतले.