मुंबई : हनुमान चालिसाच्या पठणाने राज्यातील वातावरण तापले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली आहे.
राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राणा विरोधात सेना संघर्ष चिघळत असताना गृहराज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था चांगली असल्याचा दावा केला. समाजात फूट पाडणारे वर्तन टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून सद्यस्थितीवर चर्चा केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येईल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे भासवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे प्यादे आहेत. त्यांना पुढे करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दिलीप वळसे-पाटला यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच हनुमान चालिसा पठणाचा आग्रह का धरला जातोय, असा सवाल उपस्थित केला.
राणा प्रसिद्धीसाठी स्टंट करत आहे. जर त्यांना हनुमान चालिसाचे पठण करायचे असेल तर त्यांनी मुंबई, अमरावती, दिल्ली येथील घरी करावे, असा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला.
भाजपकडून वारंवार शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे लक्ष वेधण्यात येत असल्याबद्दल तुम्हाला काय वाटते, असे पत्रकार विचारतात. हिंदुत्व हा दोन पक्षांमधील मुद्दा आहे. त्यावर मी बोलणार नाही, असे गृहमंत्री म्हणाले.