MLA Jaykumar Gore Health Update : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.
आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फलटण येथे हा अपघात झाला असून या अपघातात आमदार गोरे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
पुण्यातील रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर कपिल झिरपे यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीसंदर्भात माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, सुदैवाने जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना अपघातात जास्त दुखापत झालेली नाही. ते शुद्धीवर आले असून आता बोलत देखील आहे.
त्यांची पल्स आणि बीपी व्यवस्थित आहे. छातीला थोडासा मार लागला आहे.पॅनिक व्हायची गरज नाही.पेनकिलर दिल्याने त्यांना बरं वाटत आहे, असं डॉ. झिरपे यांनी सांगितलं आहे.
गोरे यांच्या गाडीला अपघात नेमका कसा झाला?
आमदार जयकुमार गोरे हे पुण्याहून आपली गावी दहिवडीकडे जात होते. सकाळी साडेपाच वाजता त्यांची गाडी फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावर आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले (Car Accident) आणि गाडी थेट 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली.
ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या अपघातात गोरे यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि चालकही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
जखमी अवस्थेत असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जणांना उपचारासाठी तातडीने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जयकुमार गोरे यांच्या अपघाताची माहिती मिळताच, त्यांच्या समर्थकांना मोठी धडकी भरली.
दरम्यान, जयकुमार गोरे यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे गोरे यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे.