डोंबिवली : मिसळ ही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आहे. या मिसळ मध्ये एक झटका आहे. हा स्वाभिमानाचा झटका उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि हा झटका आणि चटका आपल्याला महाराष्ट्रात अनेकांना द्यावा लागणार आहे असा झणझणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि भाजपला लगावला. डोंबिवली त आयोजित मिसळ मोहोत्सवात शनिवारी खासदार राऊत यांनी उपस्थिती लावली होती.
भाऊ चौधरी फाऊंडेशनचे अभिषेक चौधरी, श्री आराध्या ग्रुप आणि शिवसेना यांच्यावतीने डोंबिवली तील सावळाराम क्रीडा संकुलात भव्य तीन दिवसीयमिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाला दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. व्यासपीठावर भाऊ चौधरी, गोपाळ लांडगे, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार राऊत यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मनसे आणि भाजप पक्षाला वरील टोला लगावला. पुढे ते म्हणाले, मिसळ ही चवदार आहे ती आपली संस्कृती आहे. पण ज्या प्रकारे आज राजकारण सुरू आहे ती आपली संस्कृती नाही.
महाराष्ट्रात सत्ताधारी, विरोधक, विविध विचारांच्या पक्षाचे लोक ही एकमेकांच्या विरुद्ध टीका करत राहिले. पण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुडाचे, द्वेषाचे आणि कंबरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नव्हते.
या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार आणि शिवसेनाप्रमुखांमध्ये कितीतरी वाद झाले आहेत. पण ज्या पध्दतीने राजकारण भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन चार वर्षात सुरू केले आहे ते राज्य आणि देशाला परवडणारे नाही.
हिंदू ओवेसी आणि मुस्लिम ओवेसी दोन्ही महाराष्ट्र मध्ये आहे आणि एका ओवेसीला उत्तर प्रदेश मध्ये ज्यापद्धतीने वापरण्यात आले, निवडणुका जिंकण्यासाठी, त्याचपद्धतीने नवं हिंदू ओवेसींना महाराष्ट्रामध्ये शिवसेना याच्याविरुद्ध लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
औरंगाबाद येथे मनसेची सभा होणार आहे. त्यानिमित्ताने शहरात बॅनर लागले असून राज यांना हिंदुहृदयसम्राट संबोधले गेले आहे. यावर राऊत म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच आहेत. कोणी कितीही शाली पांघरल्या, कोणी किती नकला केल्या शिवसेना प्रमुखांच्या तरी शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट एकच.
डोंबिवलीकरांनी या महोत्सवात दुसऱ्या दिवशीही गर्दी केल्याचे पहायला मिळाले. यामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, कल्याण नाशिक, ठाणे, पारनेर, कोकणातील मिसळीची चव खवय्यांना चाखायला मिळाली.
खासदार राऊत यांनी महोत्सवात मिसळचा आस्वाद घेतला. दोन वर्षांनी सगळे एकत्र आलो, तोंडावर मास्क नाही आणि तोंड चालू आहे. हे असेच वातावरण राहायला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे संकट आपण पार केल असले तरी खबरदारी घ्यायची गरज आहे. खाते रहो असे आवाहन त्यांनी यावेळी खवय्यांना केले.