नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटांच्या चर्चेदरम्यान महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणार्या विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या जागांबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर आता भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी सहा जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून दिली. शहा यांच्या भेटीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कायदामंत्र्यांशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांचीही त्यांनी भेट घेतली.
दोन दिवसांच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत एकाही केंद्रीय नेत्यांची भेट घेतली नव्हती. शहा यांच्याशी त्यांची भेट होण्याची शक्यता कमीच होती.
मात्र, रात्री उशिरा ते शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. यासंदर्भात शिंदे आणि शहा यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.