हसन मुश्रीफांची ओळख करुन देताना आमदारांकडून विधानसभेत ‘जय श्रीराम’चे नारे

Hasan Mushrif

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांची सभागृहात ओळख करून दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख करून देण्यासाठी त्यांचे नाव घेताच आमदारांनी दोन ते तीन वेळा ‘जय श्री राम’चा जयघोष केला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हसतमुखाने बाक वाजवला. महत्वाचे म्हणजे इतर आमदारांची ओळख करून देताना अशा कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत. हसन मुश्रीफ यांची ओळख करून देतानाच ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. सत्तेतील सहभागावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज, सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर महाविकास आघाडीची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे. आज सकाळी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या आंदोलनादरम्यानही विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये एकजूट दिसून आली नाही. त्यात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार गैरहजर होते. काँग्रेसचे आमदारच जोरदार घोषणा देत होते. काही वेळात शिवसेना ठाकरे आमदारांनी आंदोलनात भाग घेत सरकारविरोधी घोषणा दिल्या.

अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील नवीन मंत्र्यांची ओळख सभागृहात करून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांनी पहिली ओळख करून दिली. यावेळी भाजप-राष्ट्रवादी व शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी उत्स्फूर्तपणे अजित दादांचे बगा वाजवून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

दुसऱ्यांदा छगन भुजबळ, नंतर दिलीप वळसे पाटील आणि नंतर हसन मुश्रीफ यांचे नाव मुख्यमंत्र्यांनी परिचयासाठी बोलावले. मुख्यमंत्र्यांनी प्रास्ताविकासाठी हसन मुश्रीफ यांचे नाव घेताच दोन ते तीन वेळा ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. पक्षाच्या कोणत्या आमदाराने या घोषणा केल्या हे स्पष्ट झाले नसले तरी मुश्रीफ यांच्या परिचयाच्या वेळी या घोषणा झाल्या हे विशेष.