लातूर : लातूरमध्ये आज ‘हिंदू जनक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. लव्ह जिहादच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.
यावेळी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात व देशात होणाऱ्या लव जिहाद विरोधात ‘हिंदू जनक्रोश मोर्चा’ काढण्यात आला आहे.
या संकटाकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (दि.21) रोजी लातूर येथे मोर्चा काढण्यात आला, त्यात विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
लातूर शहरातील गंज गोलाई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा काढण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आहे.
हा मोर्चा गंज गोलाई हनुमान चौक, गांधी चौक, टाऊन हॉल, अशोक हॉटेल मार्गे निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपेल. या मोर्चात व्यापारी, शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मोर्चा मार्गात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ‘आधी मोर्चा मगचं व्यापार’ असा नारा देत लातूर शहरातील व्यापाऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
लातूर शहरासह ग्रामीण भागात लव्ह जिहाद वाढत असून हे थांबवायचे असेल तर जनजागृती आवश्यक आहे. तेव्हा सुरुवात स्वतःपासून, स्वतःच्या दुकानापासून, स्वतःच्या घरापासून करावी, असे आवाहन करून हा मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्याबंदी या तीन प्रमुख मुद्द्यांवर हा मोर्चा काढण्यात आला.
मोठा पोलिस बंदोबस्त
लव्ह जिहादच्या विरोधात आज लातूर शहरात ‘हिंदू जनक्रोश मोर्चा’ काढण्यात आल्याने पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून.
मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्य चौक आणि रस्त्यालगतच्या खास ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून आले.
महिलांचीही उपस्थिती
लव्ह जिहादच्या विरोधात लातूर शहरात काढण्यात आलेल्या आजच्या ‘हिंदू जनक्रोश मोर्चा’मध्ये महिला आणि तरुण-तरुणींची विशेष उपस्थिती दिसून आली.
या मोर्चात अनेक महिला हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांच्या हातात लव्ह जिहादच्या विरोधात घोषणा देणारे फलकही दिसत होते.