लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
लातूर जिल्ह्यात जेवढे नेते तेवढे गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे एका गटाचे दुसऱ्या गटासोबत जमत नाही. भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी त्यांची एक ‘टीम’ तयार केली आहे.
रमेश कराड यांची ‘टीम’ कायम संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाला आव्हान देत असते. रमेश कराड यांनी त्यांचा टीम लीडर म्हणून सुधाकर भालेराव यांना पुढे केले आहे.
माजी आमदार सुधाकर भालेराव संधी मिळेल तेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाला आव्हान देत असतात.
त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लढणार नाही हा सुधाकर भालेराव यांचा आक्षेप नवा नाही.
त्यामुळे निलंगेकर यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी जिल्ह्यातील निवडणुका एकहाती जिंकेल असा नेता सध्यातरी नाही. संभाजी पाटील निलंगेकर यांचे नेतृत्व नाकारताना पर्यायी नेतृत्वाचा अभाव आहे.
नगर पंचायत निवडणुकीत जिल्हाध्यक्षांच्या मर्यादा ठळकपणे उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तोडगा काढायचे ठरविले तरी तोडगा मान्य करण्याचे बंधन कोणावरही नाही.
लातूर भाजप कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत सुधाकर भालेराव यांनी हा ‘आक्षेप’ घेतल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
सुधाकर भालेराव यांना निवडणुकीसाठी सक्षम नेतृत्व हवे आहे, याचाच अर्थ संभाजी पाटील निलंगेकरांऐवजी जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांचे नेतृत्व हवे आहे.
जिल्हाध्यक्ष रमेश कराड चर्चा घडवून आणतात आणि हात झटकून बाजूला होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले ते नाकारतात, यातच सर्वकाही आले.
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यातील राजकारण संभाजी पाटील निलंगेकर यांच्या भोवती फिरायचे, ते घेतील तो निर्णय आणि ठरवतील ते धोरण ‘फायनल’ होते.
राज्यात व जिल्ह्यात सत्तेची समीकरणे बदलली आणि अभिमन्यू पवार, रमेश कराड, माजी आमदार सुधाकर भालेराव व माजी आमदार विनायकराव पाटील यांनी आपापल्या परीने संभाजी पाटील यांना आव्हान द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आज उघड ‘विरोध’ होऊ लागला आहे.
हा विरोध मोडून काढून पुन्हा एकदा आपली ‘जागा’ निर्माण करण्यासाठी संभाजी पाटील यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. हे सोपे वाटत असले तरी भले मोठे आव्हान आहे.
जिल्हाध्यक्ष रमेश कराड सुधाकर भालेराव यांच्या खांद्यावर बसून अचूक नेमबाजी करीत आहेत. सुधाकर भालेराव रमेश कराड यांच्या आडून हवी तशी शिकार करीत आहेत.
सुधाकर भालेराव विरुध्द संभाजीराव पाटील निलंगेकर संघर्षात पडद्यावर व पडद्याआड अनेक हात आहेत. संभाजी पाटील निलंगेकर सध्यातरी एकाकी पडले आहेत. अस्तित्वाची लढाई लढत आहेत.
भाजपातील अंतर्गत बंडाळीला लातूर कॉंग्रेसच्या नेत्यांनीही तडका दिला आहे. त्यामुळे त्याचा ठसका भाजपाला जोरात बसणार आहे. या वर्चस्वाच्या लढाईत कॉंग्रेसची बंपर लॉटरी लागणार आहे.