लातूर : शहरातील गांधी मार्केट येथे दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यावसायिकाचा मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पाठलाग केला. चाकू हल्ला करून 1 लाख 80 हजार रुपये किमतीची बॅग चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उड्डाणपुलावर घडली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चाकू हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
पोलिसांनी सांगितले की, लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरात असलेले इलेक्ट्रिकलचे दुकान बंद करून व्यापारी मदन गंगाधर बिदरकर (वय 49, रा. वैभव नगर, लातूर) हे गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वैभव नगर येथील घराकडे निघाले.
त्याच्याकडील 1 लाख 80 हजार रुपयांची बॅग त्याच्या दुचाकीवर अडकवली होती. गांधी मार्केट येथून ते दुचाकीवरून घरी जात होते. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.
छत्रपती शिवाजी महाराज चाैक येथील उड्डाणपुलावर जेव्हा आले. यावेळी वाहतूक तुरळक होती. उड्डाणपुलावरील पथदिवेही बंद करण्यात होते. अंधारात कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचा संशय त्यांना आला.
यावेळी त्याने मागे वळून पाहिले असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन जण त्याचा पाठलाग करताना दिसले. जवळ येताच त्यांनी मदन बिदरकर यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अन्य एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांची बॅग आणि मोबाईल असा 1 लाख 80 हजार रुपये हिसकावून दोघांनी पळ काढला. त्यांनी आरडाओरड केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत दोघेही दुचाकीवरून फरार झाले.
लातूरमध्ये रात्री हा थरार घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठेड करीत आहेत.