कोल्हापूर : आज जाहीर झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीचा फटका भाजपला बसला आहे.
मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्याचा पक्षाला मोठा फटका बसला, अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठांमध्ये सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने कोल्हापुरात हिंदुत्वाचा मुद्दा फोल ठरतोय का, यावर पक्ष विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, निकालानंतर आपण हरलो तर हिमालयात जाऊ, असे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक मीमही टाकला आहे. एवढेच नाही तर पोस्टर लावून शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला जात आहे.
सरकार पडेल, सरकार 10 मार्चनंतर पडेल, हे माझे आव्हान आहे, आज कोल्हापूर विधानसभेचा राजीनामा द्या आणि आज पोटनिवडणूक घ्या, निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे वक्तव्य केले होते.
या फाजील विधानांचा फटका भाजपला निवडणुकीत बसला का? ही पोटनिवडणूक असली तरी ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे हा पराभव भाजपला जास्त बोचल्याचे बोलले जात आहे.
त्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे या मुद्यावर मत महत्त्वाचे ठरणार आहे. ते काय भूमिका घेतात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मात्र आता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या विधानांमुळे चंद्रकांत पाटील यांना घेरणार का? तसेच या पराभवाचे लक्ष्य कोणाकडे राहणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता भाजपच्या काही नेत्यांनी फेटाळून लावली आहे. तरीही मागच्या काही महिन्यात चंद्रकांत पाटील यांची विधाने वादग्रस्त ठरलेली आहेत.