मुंबई : तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत.
काही पर्याय जास्त जोखमीचे असतात; पण त्यात परतावा चांगला मिळतो. काही पर्यायांमध्ये जोखीम शून्य असते आणि परतावा चांगला मिळतो.
तुम्ही शून्य जोखमीच्या आणि चांगला परतावा मिळवून देणाऱ्या पर्यायाच्या शोधात असाल तर Kisan Vikas Patraमध्ये पैसे गुंतवा.
या योजनेचा कालावधी १० वर्षे ४ महिने असतो. या योजनेत तुम्ही ३० जूनपर्यंत गुंतवणूक केलीत तर दहा वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील.
या योजनेत ६.९ टक्क्यांचे वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते. केवळ १ हजार रुपयांत तुम्ही किसान विकास पत्र खरेदी करू शकता.
यात पैसे गुंतवण्याची कोणतीही मर्यादा नाही. हवे तेवढे पैसे तुम्ही गुंतवू शकता.
ही योजना १९८८ साली सुरू करण्यात आली होती व सुरुवातीला फक्त शेतकऱ्यांसाठी होती. आता यात कोणीही गुंतवणूक करू शकतो.
तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असाल तर पॅन कार्ड जमा करावे लागते.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही जवळच्या टपाल कार्यालयात किंवा सरकारी बँकेत जाऊ शकता.
१० लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत जाहीर करावा लागेल.
अशी आहे योजना
या योजनेत गुंतवलेले पैसे एकदम सुरक्षित राहतात. यात १ हजार, ५ हजार, १० हजार, ५० हजार च्या पटीत पैसे गुंतवता येतात.
किसान विकास पत्र तारण ठेवून तुम्ही कर्जही घेऊ शकता. या योजनेला प्राप्तिकरात सूट मिळते.
यातून मिळणारा परतावा करपात्र आहे; मात्र योजनेपश्चात मिळणारी रक्कम करमुक्त आहे.
या योजनेतील रक्कम १२४ महिन्यांनंतर काढता येते. याचा लॉक इन पिरेड ३० महिन्यांचा आहे.
त्याआधी तुम्ही पैसे काढू शकत नाही. ही योजनेत पैसे गुंतवण्यासाठी ओळखपत्राची गरज असते. तुम्ही वैयक्तिक किंवा जोडखाते उघडू शकता.