नांदेड : महात्मा बसवेश्वरांच्या सामाजिक व धार्मिक चळवळीतील शरण ऊरिलिंग पेद्दी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी निघणाऱ्या समता संदेश पदयात्रेचे प्रस्थान ता.25 डिसेंबर रोजी कुरुळा ता.कंधार जि.नांदेड येथून होणार असून सातत्याने नऊ वर्षापासून ही पदयात्रा कंधार परिसरातून निघत असते.
बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी लोकशाहीचा पाया रचला व अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. वेगवेगळ्या जातीसमुहातील सातशे सत्तर शरणांना सोबत घेऊन जातीअंताचा लढा उभारला. समाजाला समतेची व श्रमप्रतिष्ठेची शिकवण दिली.
बाराव्या शतकातील समतासुर्य म्हणून ओळखले जाणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे एक तेजस्वी किरण म्हणजेच शरण ऊरिलिंग पेद्दी आहेत. शरण ऊरिलींग पेद्दी मुळचे होलार जातीचे होते. तात्कालीन व्यवस्थेत शुद्र असणाऱ्या पेद्दींची तपस्या व प्रतिभा ओळखून महात्मा बसवण्णांनी पेद्दींना कंधार येथील लिंगायत मठाचे धर्मगुरु बनवले.
सामाजिक समतेचा व परिवर्तनाचा हा सर्वात मोठा मैलाचा दगड त्याकाळी किंबहुना आजही ठरतो आहे. बसव स्पर्शाने प्रेरित होऊन शरण ऊरिलिंग पेद्दींनी बसव विचारांचा मोठा प्रचार कंधार नांदेड व तेलंगणा परिसरात केला. सदाचार व समतेची शिकवण दिली.
महात्मा बसवेश्वरांच्या व शरण ऊरिलिंग पेद्दींच्या पदस्पर्शाने व कर्तुत्वाने पावन झालेल्या या कंधार परिसरातील हा तेजस्वी इतिहास लोकाभिमुख करण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन कुरुळा ता.कंधार येथून करण्यात येते.
चालू वर्षी या समता संदेश पदयात्रेचे उद्घाटन ता.25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. प.पू.सिद्धदयाळ शिवाचर्य महाराज बेटमोगरा व प.पू.संगनबसव महास्वामीजी विरक्त मठ निलंगा यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या पदयात्रेचे उद्घाटन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार असून ध्वजपूजन आमदार तुषार राठोड करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार गंगाधर पटणे, माजी आमदार मनोहर पटवारीसह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
बसव विचारांच्या प्रचारासाठी निघत असलेल्या या ऐतिहासिक पदयात्रेचे नेतृत्व सुप्रसिद्ध बसव कथाकार शिवानंद हैबतपूरे करणार असून ही पदयात्रा कुरुळा-दिग्रस -जांब -जळकोट-कोळनूर-तिरुका- नळगीर-उदगीर-तोगरी-देवणी-वडमुरंबी-मेहकर-हुलसूर-बेलूर मार्गे ता.31 डिसेंबर रोजी बसवकल्याण येथील अनुभव मंटपात पोहंचणार आहे.
पदयात्रेच्या मार्गावर बावीस धर्मसभांचे आयोजन करण्यात आले असून यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीत रहाणार असून या पदयात्रा उद्घाटन सोहळ्यात सर्व बसवप्रेमींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन पदयात्रेचे निमंत्रक भगवान चिवडे यांनी केले आहे.