औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस तपासाला गती मिळाली आहे. बैठकीत केलेल्या वक्तव्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. लवकरच साक्षीदारांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील 1 मे च्या सभेच्या संदर्भात आरोप करण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी आपल्या भाषणाने लोकांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिटी चौकाचे पोलिस निरीक्षक गिरी यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सभेच्या ठिकाणाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी सभेतील भाषणाचे पुरावे गोळा केले आहेत. उद्या, शुक्रवारी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
राज ठाकरे यांना तत्काळ नोटीस बजावायची की नंतर, हे तपास अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे, असे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह सगळेच प्रमुख नेते हे आंदोलनाच्या दिवशी नॉट रिचेबल होते. त्यांच्यावरून मोठी टीका होत होत.
या सर्व प्रकारावर आता साईनाथ बाबर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांचा प्रचंड दबावामुळे आम्ही बाहेर पडू शकलो नसल्याचं ते म्हणाले.
तसंच वसंत मोरे हे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे तिरुपती बालाजी येथे गेले होते. त्याची पूर्वकल्पना ही त्यांनी या आधीच दिली होती. मनसेच्या आंदोलनाचा परिणाम दिसून येतो आहे. पहाटेची अजान आता भोंग्यावर होत नसल्याचे दिसून येत आहे.
तर दुपारच्या अजानसाठी ठरवून दिलेल्या डेसीबलमध्ये आवाजाची मर्यादा असल्याचे देखील दिसून आले आहे.. त्यामुळे मनसेने जे काही आंदोलन छेडलं होतं यशस्वी झाले आहे, असा दावा बाबर यांनी केला.