Ganpati Utsav 2022 | क्षेत्रीय कार्यालयांत मिळणार ना हरकत प्रमाणपत्र

0
72
Ganpati Utsav 2022 | No Objection Certificate will be available in Regional Offices

लातूर : शहरात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, गणेश मंडळांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने चारही झोन ​​कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

याशिवाय नागरिकांना तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांकही देण्यात येणार आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, मंडळांकडून मंडप व देखावे उभारणीचे कामही सुरू झाले आहे.

गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांना महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मंडळांना हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पालिकेच्या चारही झोन ​​कार्यालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. लाऊड स्पीकर, रस्त्यावर स्टेज उभारणे, अनधिकृतपणे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करणे आदींबाबत तक्रार करण्यासाठी पालिकेच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे.

नागरिकांना 02382-246075 या क्रमांकावर कॉल करून तक्रारी नोंदवता येतील. याशिवाय चारही क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक दिले जाणार आहेत.

‘ए’ झोनसाठी 9011032210, ‘बी’ झोनसाठी 9890435922, ‘सी’ झोनसाठी 9404225379 आणि ‘डी’ झोनसाठी 9011032302 क्रमांक आहेत. नागरिकांनाही या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे आपल्या तक्रारी नोंदवता येणार आहेत.

महापालिकेच्या वतीने या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

‘अ’ आणि ‘ब’ झोनच्या उपायुक्त विणा पवार, तर ‘क’ आणि ‘ड’ झोनच्या उपायुक्त मयुरा शिंदेकर यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत 597 गणेश मंडळांची नोंदणी  

31 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिस ठाण्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. शहरात आतापर्यंत 597 सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली आहे. येत्या आठ दिवसांत आणखी भर पडेल.

गणेश मंडळांची जोरदार तयारी

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ शकला नाही. यंदा कोरोनाचा धोका पूर्णपणे मावळल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी कंबर कसली आहे.

शहरातील प्रसिद्ध गणेश मंडळांसह अन्य गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. मंडप उभारणीला वेग आला आहे.

श्रींच्या मूर्तीची निवड आणि बुकिंग करण्यापासून विविध परवानग्या मिळवणे आणि दहा दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन करणे यात सर्व गणेश मंडळ व पदाधिकारी व्यस्त आहेत.