उदगीर : मतदार संघातील बहुतांश भाग हा डोंगरी भाग असुन अनेक गावामध्ये आजही पाणीटंचाई असल्या कारणाने प्रत्येक वेळी उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांना घागर भर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शासनाच्या विविध 148 योजनेमधून प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचा निर्धार केला आहे.
त्यामध्ये उदगीर-जळकोट मतदारसंघातील 140 गावांसाठी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली आहे. सदर पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करा व संबंधीत पाणीपुरवठ्याचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
ते लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पाणीपुरवठ्यासंबंधी आयोजीत बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना देत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी नगरसेवक शमशोद्दीन जरगर, मादलापुरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, आदी उपस्थित होते.
उदगीर-जळकोट मतदारसंघासाठी भरघोस निधी आला आहे, त्यामुळे मतदार संघातील लहान-मोठ्या गावासह वाडी तांड्यावर देखील आता पाणीटंचाई भासणार नाही याची दक्षता घेवुन सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे. संबंधित काम हे ठेकेदाराकडुन दर्जेदार व दिलेल्या कालावधीत पुर्ण करुन घेण्याच्या सुचना देवून प्रत्येक गाव निहाय आढावा घेतला.
या पाणी पुरवठा योजनेची तांत्रीक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असुन 140 योजनेच्या माध्यमातून मार्च-2024 अखेर मतदार संघातील सर्व कामे पूर्ण होणार असून तात्काळ काम सुरू करण्याच्या सुचना आ.बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी उप अभियंता एस.पी.गर्जे, ग्रामीण विभाग जिल्हा परिषद लातूरचे कार्यकारी अभियंता बी.आर.शेलार, महाराष्ट्र जीवन प्राधिकारणचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कायंदे यांच्यासह सर्व तालुका स्तरीय अभियंत्यांची गाव निहाय आढावा बैठक घेण्यात आली.