मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले.
त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून चार मुद्दे मांडले आहेत.
त्यात त्यांनी पक्ष आणि शिवसैनिकांना अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे भावनिक आवाहन केले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिंदेंच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
- गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारचा फायदा घटक पक्षांनाच झाला आणि शिवसैनिक भरडले गेले.
- घटक पक्ष मजबूत होत असताना, शिवसैनिक-शिवसेनेची पद्धतशीरपणे फसवणूक केली जात आहे.
- पक्ष आणि शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय आता घेण्याची गरज आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.#HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
काय आहे उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन?
उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे म्हणणे होते, शरद पवार यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री झालोय.
दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, सत्तेसाठी आम्ही एकत्र आलो असलो तरी विचार वेगळे आहेत. कमलनाथ यांनी आज सकाळी फोन केला. पवारांनी काल फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले, त्यांनी विश्वास ठेवला.
मी मुख्यमंत्री नको असे माझेच लोक म्हणत आहेत. ते मला माझे मानतात की नाही हे मला माहीत नाही. तुम्ही इथे येऊन का बोलला नाही? मला समोर येऊन बोलायचे होते.
मुख्यमंत्री म्हणून तुम्ही नालायक आहात, तुम्ही नको, असे त्यांनी म्हणायला हवे होते. मुख्यमंत्री म्हणून नको, तर मी मुख्यमंत्री होणार नाही, मात्र असे एकाही आमदाराने मला सांगितले नाही.
आज मी वर्षा बंगला सोडतो आणि मातोश्रीवर राहतो. मला सत्तेची लालसा नाही. तुम्ही सारे असं का करताय, कोणाला दुखावताय आणि दुखवायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
महाविकास आघाडीबाबत काय म्हणाले ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत सकारात्मक विधान केले. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केल्याचं ते म्हणाले.
या दोन्ही नेत्यांबद्दल सकारात्मक बोलून त्यांनी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.