आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना वाटेतच मृत्यूने गाठले, उदगीरातील 5 जण जागीच ठार

Devotees returning from Mother Tuljabhavani's darshan die on the way, 5 people die on the spot from Udgir

लातूर : आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

स्विफ्ट कार आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला असून एसटी बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघातामुळे स्विफ्ट कार आणि एसटी बसची अवस्था पाहून ही टक्कर किती भीषण होती याची कल्पना येऊ शकते. तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन भाविक लातूर जिल्ह्यातील उदगीरला परतत होते.

हे सर्वजण मारुती स्विफ्ट कारमधून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप मारली. भरधाव वेगात आलेल्या कारची एसटी बसची धडक लागून हा अपघात झाला.

उदगीर येथील हॉस्पिटलमध्ये काम करणारे काही लोक आणि नर्सिंग कॉलेजचे 2 विद्यार्थी उदगीर शहराकडे निघाले होते. हैबतपूर पट्टीजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या एस बसवर कारची समोरासमोर धडक झाली.

यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या एकाला तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातात ठार झालेल्यांची नावे

आलोक खेडकर (वय-21) रा. उदगीर
अमोल देवकते (वय-24) रा. रावणकोळ ता.मुखेड जि. नांदेड
कोमल कोद्रे (वय-22) रा. दोरनाळ ता. मुखेड जि. नांदेड
यशोमती देशमुख (वय-28) रा. यवतमाळ
नागेश गुंडेवार (वय-27) रा. उदगीर

एसटी बस उदगीरहून चाकुरकडे जात होती. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर भाविकांचे मृतदेह कारमधून बाहेर काढण्यासाठी कार कापावी लागली. गॅस कटरच्या सहाय्याने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पाच तरुणांच्या मृत्यूने उदगीर शहरावर शोककळा पसरली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचेही मोठे नुकसान झाले आहे.

प्रियांका बनसोडे (वय-22) या अपघातातून बचावल्या, मात्र त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्यासोबत असलेल्या पाच जणांच्या अपघाती मृत्यूने प्रियांकाला जबर धक्का बसला.

अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढली. एसटीच्या पुढील काचाही फुटल्या असून चालक देखील जखमी आहे.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. या अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली असून पोलिसांनी या अपघातांची नोंद केली आहे.