मुंबई : काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्री भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे काँग्रेसची मोठी अडचण होणार असल्याची चर्चा आहे.
एकीकडे काँग्रेस फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच काल काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.
या दोन्ही नेत्यांची भाजप प्रवक्त्याच्या घरी भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा यापूर्वी सुरु होती. त्यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले असून, आता या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
अशोक चव्हाण भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले. काल सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तेथे आले.
दोन्ही नेते एकाच वेळी कुलकर्णी यांच्या घरी पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चव्हाण आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जाते.
मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतल्याने चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
चव्हाण यांची भूमिका महत्वाची
याआधीही अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र अशोक चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळून लावली. काँग्रेस सोडणार नसल्याचे चव्हाण म्हणाले होते.
मात्र चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर भाजपने सोईस्कर मौन पाळले. त्यामुळे चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा अधिक रंगली होती.
अदृश शक्ती कोणाची?
शिंदे सरकारच्या बहुमत चाचणी दरम्यान अशोक चव्हाण यांच्यासह चार ते पाच आमदार उशिराने सभागृहात पोहोचले.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यामागे काही अदृश्य हात असल्याचे सूचित करणारे विधान केले होते. फडणवीस यांचे विधान आणि चव्हाण यांचे सभागृहात उशिरा येणे याचाही त्यावेळी संबंध आला.
चिखलीकरांचे निमंत्रण
काँग्रेसमधील अनागोंदी आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून बाहेर पडावे लागल्याने भाजपचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावरही अनेक तर्कवितर्क लढवले गेले.
काँग्रेसचे काय होणार?
दरम्यान, काँग्रेसचा चुराडा होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांत हा नेता आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्रीही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर काँग्रेसची मोठी अडचण होणार असल्याचे बोलले जात आहे.