पुणे : मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, पुण्यातून लोकसभा लढवणार नाही, तुम्हाला मी महाराष्ट्रात नको का? असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर मिश्कीलपणे विचारत प्रश्नाला बगल दिला.
आज पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नोंदणी आणि मुद्रांक भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
फडणवीस म्हणाले, पुण्याचे दोन तुकडे होणार हा नवा वाद का निर्माण करत आहात, ते कधी करायचे ते बघू, राज्य सरकारकडे आज कोणताही प्रस्ताव नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र, राज्य सरकारकडे आज कोणताही प्रस्ताव नाही.
तसेच, मुंबईची तिसरी महापालिका (BMC) करण्याचा कोणताही विचार नाही. आम्हाला विकासाकडे वाटचाल करायची आहे, वादाचे नवे विषय काढू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.
काल पुण्यातील एका कार्यक्रमात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) विभाजनाची गरज असल्याचे विधान केले होते, त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी वरील विधान केले.
यावेळी बोलताना फडणवीस यांना पत्रकारांनी लोकसभेवर जाण्याच्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले, मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, मी पुण्यातून लोकसभा लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको का? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी पत्रकारांना विचारला आणि ही केवळ माध्यमांमध्ये चर्चा असल्याचेही सांगितले.
तसेच मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाली नाही. मी एका गणपतीच्या ठिकाणी पोहोचलो, पण आमची भेट झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.