दिल्ली, मुंबई आणि पुणे विमानसेवा लवकरच सुरू होणार

केंद्रीय केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

नांदेड (प्रभाकर पांडे) : नांदेड येथून नांदेड-मुंबई, नांदेड-दिल्ली आणि नांदेड पुणे ही विमानसेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांची खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळाने केली होती.

या विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येतील अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांनी दिली आहे.

शीख धर्मीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वारा येथे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे.

जगातील कानाकोपऱ्यातून हुजूर साहेब सचखंड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही लक्षणिय वाढ झाली आहे.

नांदेड शहराचा झपाट्याने होत असलेला विकास हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नांदेडला राष्ट्रीय पातळीवर जोडण्यासाठी ही विमान सेवा अत्यावश्यक ठरणारी आहे.

नांदेड-पुणे, नांदेड-दिल्ली आणि नांदेड-मुंबई या तिन्ही मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, जहीराबादचे खासदार भीमराव पाटील, मनमाडचे खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन केली होती.

नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि उद्योग व्यवसायाच्या नवीन वाढीसाठीही विमानसेवा अत्यावश्यक ठरणारी आहे.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे नांदेडला आणि मराठवाड्याला अनेक रेल्वे सेवांचा लाभ मिळाला आहे.

त्यामुळे मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत.

आता विमानसेवा अधिकाधिक दर्जेदार व्हावे आणि नांदेडकरांना मुंबई, पुणे, दिल्ली येथे तातडीने पोहोचता यावे.

आपली कामे नियोजित वेळेत करता यावीत, या अनुषंगाने या विमानसेवा प्राधान्याने सुरू कराव्यात अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या शिष्टमंडळासह केली आहे.

कारण नांदेड हे एज्युकेशन हब बनले आहे. एमबीबीएस आणि आयआयटीचे नांदेड हे प्रवेशद्वार ठरत असल्याने येथे खाजगी शिकवणीसाठी मुंबई पुणे यासह दिल्ली आणि देशातील विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत.

त्यामुळे शैक्षणिक हब ठरत असलेल्या नांदेडला विमानसेवेने जोडणे अत्यावश्यक होत आहे. त्यामुळे नांदेड येथे तातडीने ह्या तिन्ही मार्गावरील विमानसेवा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास दिला आहे.

त्यामुळे लवकरच नांदेडकरांना मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे विमानसेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.