मुंबई : शिवसेनेचे हक्काचे मैदान म्हणून ओळखल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि खरी शिवसेना म्हणवून घेणाऱ्या शिंदे गटात खडाजंगी सुरु आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल देत शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, या दसरा मेळाव्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात भाजपनेही शिंदे गटाच्या बाजूने लढा सुरू केला आहे.
यंदा बीकेसी येथे ‘दसरा मेळावा’ आणि शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळा’ होणार असल्याचे सांगत भाजपने उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्विट केले आहे.
त्यामुळे शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला न्यायालयाने उद्धव ठाकरेंना परवानगी दिली असली तरी या मेळाव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी अर्ज केला होता.
अखेर मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोघांनाही परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत दिलासा मागितला.
अखेर या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली.