Big Update : विधानपरिषदेत भाजपचा सभापती होणार? मंत्रीपद गमावलेल्या नेत्याचे नाव आघाडीवर!

BJP will be the chairman in the legislative council? This leader's name on the forefront!

Chairman of BJP Legislative Council | मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडून राज्याची सत्ता काबीज केली.

एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असतानाही विधानसभा अध्यक्षपदासह मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवून भाजपने सरकारमधील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या घडामोडींमुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याची रणनीती भाजप नेतृत्व आखत असल्याचे समोर आले आहे.

विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने या सभागृहाच्या अध्यक्षपदावर पक्षाच्या नेत्याला बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सभागृहाच्या कामकाजावर आपली पकड घट्ट करण्यासाठी भाजप सभापतीपद मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.

खरे तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही राम शिंदे यांचे नाव चर्चेत होते. मात्र पक्षनेतृत्वाने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर या पदासाठी विश्वास टाकला. त्यामुळे आता भाजपकडून राम शिंदे यांना सभापतीपदाच्या शर्यतीत संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेत संख्याबळ कसे?

विधान परिषदेत एकूण 78 सदस्य असतात. सध्या या सभागृहात भाजपकडे 24, शिवसेनेकडे 11 तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 10 जागा आहेत. तसेच 16 जागा रिक्त आहेत.

यामध्ये राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 12 जागांचाही समावेश आहे. राज्यात भाजप-शिंदे गटाची सत्ता असल्याने या 12 जागांसाठी मंत्रिमंडळाने सुचवलेल्या नावांवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच शिक्कामोर्तब करतील.

त्यामुळे भाजपचे संख्याबळ 36 पर्यंत वाढणार आहे.तसेच एक रास आणि एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्याने भाजपची एकूण संख्या 38 वर जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आले तरी त्यांची संख्या 31 आहे. शेकाप आणि इतर काही पक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तरी त्यांच्याकडे जास्तीत जास्त 36 आमदार असू शकतात.

त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची दमछाक होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता असून भविष्यात कोणती समीकरणे जुळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.