कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आज रुईकर कॉलनी येथे कॉफी पे चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक करताना दिसले. सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणार भाषण कालचं राज ठाकरेंचं भाषण होतं. मी धार्मिक नाही तर धर्माभिमानी आहे हे त्यांचे विधान मला आवडले.
हिंदू या शब्दात सर्वधर्म समान आहेत. हिंदू बुरसटलेले आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली, असे पाटील म्हणाले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम उपस्थित होते.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
कोल्हापुरातील जनतेला काँग्रेस-राष्ट्रवादीने थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखविले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी येत्या दिवाळीत थेट पाईपलाईनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याने कोल्हापूरकरांना आंघोळ घालण्याची घोषणा केली होती.
मुश्रीफ सध्या गोंधळात आहेत. त्यामुळे विधाने करत आहेत. कोल्हापुरातील थेट पाईपलाईन प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी आहे, आंघोळीसाठी नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अत्याचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ओळख जगभरात उंचावली आहे. त्यांनी हिंदूंची प्रतिष्ठा बहाल केली आणि हिंदूंना प्रतिष्ठा दिली. पूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अत्याचार होत होते.
तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींच्या घरात धार्मिक उपासना काटेकोरपणे पाळली जात होती. पण इतर लोक धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना पूजा करण्यास मनाई करत होते. माननीय मोदींनी या ढोंगी लोकांपासून सर्वांना मुक्त केले आहे आणि त्यांना पूजा करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे असेही ते म्हणाले.
मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही
माझ्यासारख्या सामान्य गिरणी कामगाराच्या मुलाला आठ राज्यांची खाती सांभाळणे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना सहन होत नाही.
त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे नेते माझ्यावर टीका करत आहेत. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याप्रमाणे मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही,’ असेही ते म्हणाले.
पेटीएमच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पैसे पोहोचवण्याचा कट
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे घाबरलेली महाविकास आघाडी पेटीएमद्वारे मतदारांच्या खात्यात काळा पैसा वितरित करण्याच्या तयारीत आहे.
यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.