मुंबई : कन्हैयालाल हत्याकांड प्रकरणासंबंधी व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड केला म्हणून कश्मिरच्या तरुणाची सटकली.
त्या रागातून त्याने व्हिडीओ अपलोड करणाऱया 15 वर्षीय मुलीला संपर्क साधला आणि अर्वाच्य शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.
याची तत्काळ दखल घेत व्ही. पी. रोड पोलिसांनी कश्मीर गाठून त्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या.
गिरगाव परिसरात राहणाऱया एका मुलीने कन्हैयालाल हत्याकांड प्रकरणासंबंधी आपल्या भावना व्यक्त करणारा व्हिडीओ समाज माध्यमावर अपलोड केला होता.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कश्मिरच्या एका तरूणाला राग आला. त्याने मुलीचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला तीन वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून व व्हाँट्सअपवर मेसेज पाठवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
तसेच तिला ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या मुलीच्या पालकांनी लगेच व्हि पी रोड पोलिस ठाणे गाठून धमकावणाऱया अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली.
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमित भोसले तसेच परब, तावडे हे पथक कश्मिरला पाठविण्यात आले.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधाशोध करून फयाद अहमद गुलाम मोहमद भट (30) याला ताब्यात घेऊन ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले.
त्याला आज कोर्टात हजर केले असता 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. व्हि पी रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.