आजची कविता | मी जशीची तशी : धनश्री पाटील, नागपूर

aajchi kavita mi jashichi tashi by dhanshiri patil nagpur

मी जशीची तशी

*****

टळून गेला प्रहर
मी जशी ची तशी
गळून गेला बहर
मी जशीची तशी …..

नजर अशी बोचरी
फिरता तनुवरी
करून गेली कहर
मी जशीची तशी ….

लावण्याआड माझ्या
भळभळत्या वेदना
जळून गेला पदर
मी जशीची तशी ….‌

भिजवून खांदा तुझा
मांडल्यात मी व्यथा
शिवून टाकले अधर
मी जशीची तशी ….

विडंबन जमले मला
जीवनाचे वाटते
हसून प्राशिले जहर
मी जशीची तशी ……

पळविण्यास वेदना
शिकून मी घेतली
दुःख वेडी गझल
मी जशीची तशी ….

कुठेच ना सोडले
चिन्ह किंवा ठसे
गोपनीय ही बखर
मी जशीची तशी …..

****

धनश्री पाटील, नागपूर