लखनौ (उत्तर प्रदेश): अयोध्येतील सुप्रिया वर्मा (वय ३२) या पाच महिन्यांच्या गरोदर शिक्षिकेच्या खून प्रकरणाचा तपास करण्यात महिनाभरानंतर पोलिसांना यश आले आहे.
शिक्षिकेची हत्या तिच्या अल्पवयीन प्रियकराने केल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
सुप्रिया वर्मा या शिक्षकाचे १७ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलाला तिच्यासोबतचे नाते संपवायचे होते. मात्र, शिक्षिकेला हे मान्य नव्हते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका अल्पवयीन प्रियकरावर संबंध तोडू नये म्हणून दबाव टाकत होती.
यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन प्रियकराने तिला जीवे मारण्याचा कट रचला. 1 जून रोजी महिला शिक्षिका घरी एकटी असताना तिला भेटण्याच्या बहाण्याने तो तिथे गेला.
महिला शिक्षिकेच्या घरात घुसताच त्याने तिच्यावर चाकूने वार केले. यात महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. महिलेवर चाकूने तब्बल २४ वार केले होते.
पोलिसांनी तपासाचा आधार घेत मुलाच्या टी-शर्टची प्रिंट घेतली आणि ऑनलाइन साइट्सपासून ते रेडिमेड स्टोअरपर्यंत कोणत्या ग्राहकाने अशा पॅटर्नचा टी-शर्ट खरेदी केला आहे, याची माहिती घेतली.
दोन महिन्यांपूर्वी फ्लिपकार्टवरून एका महिला शिक्षिकेच्या घरी अशा प्रकारचा टी-शर्ट डिलिव्हरी झाल्याचे कळले.
पोलिस पुढे अल्पवयीन आरोपींपर्यंत पोहोचले. अल्पवयीन आरोपीला टी-शर्टबाबत विचारणा करण्यात आली. तो टी-शर्ट त्याने पोलिसांना दिला.
पोलिसांनी टीशर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असता, त्यात रक्ताचे डाग दिसले.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाची कडक चौकशी केल्यानंतर त्याने खूनाची कबुली दिली. आरोपी अल्पवयीन मुलाने आपले महिला शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.
मात्र त्याला हे नाते संपवायचे होते. मात्र, महिला शिक्षिका मान्य करत नव्हती. तिने त्याला बदनाम करण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिक्षिकेची चाकूने निर्घृण हत्या केली.
अयोध्येचे डीआयजी एपी सिंह यांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपी हा १२ वीचा विद्यार्थी आहे. गुणपत्रिकेनुसार त्याचे वय साडेसतरा वर्षे आहे.
मात्र, तो त्याच्या वयापेक्षा खूपच मोठा दिसत आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. अहवाल हाती आल्यानंतर तो प्रौढ की अल्पवयीन हे स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.