नात्यातील महिलेचा अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या, डोहात फेकला मृतदेह

140
Crime News :

मनाठा (नांदेड): मार्लेगाव येथील एका २१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे.

निर्घृणरित्या हत्या करुन मृतदेह नदीकाठावरील बोरगाव शिवारातील डोहात फेकण्यात आला होता. सचिन मुरलीधर कदम असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गुरुवारी सकाळपासून गायब होता.

सचिन मुरलीधर कदम तरुण गुरुवारी सकाळी १०:०० वाजता शेतात गेला होता. मात्र, सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही.

नातेवाईकांनी शेतात आणि गावात सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून आला नाही. त्यामुळे गावातील ३० ते ४० तरुणांनी त्याचा शोध नदीत घेतला, तिथेही तो आढळून आला नाही.

त्यानंतर रात्री १० वाजेच्या दरम्यान नदीकाठावरील बोरगाव शिवारातील डोहात सचिनचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मनाठा पोलिसांना मिळाली.

उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील कल्याण यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. तपासानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

नात्यातील महिलेचा अश्लील व्हिडिओ केल्याने हत्या

सचिनने नात्यातील एका महिलेचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर सचिनने तो व्हिडीओ एका मित्राला शेअर केला.

या मित्राने व्हिडिओ ज्या महिलेचा होता तिच्या नातेवाईकास दाखवला. यावरून संतापलेल्या दोघांनी शेतात गेलेल्या सचिनचा भरदिवसा खून करून मृतदेह डोहात फेकून दिला.

याप्रकरणी मृताचा भाऊ कृष्णा मुरलीधर कदम याच्या फिर्यादीवरुन हदगाव ठाण्यात मार्लेगाव येथील तातेराव कदम (७०), दिंगबर तातेराव कदम (४५) आणि शिवा सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.