बीड, 25 मार्च : बीडमधील शाहुनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका विवाहितेला सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले आहे. या भीषण घटनेत विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.
कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दीर आणि जाऊसह तिच्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
यास्मिन शकूर शेख असे खून झालेल्या २१ वर्षीय विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मृत यास्मिनचे वडील रहीम शरीफोद्दीन शेख (इस्लामपुरा, बीड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शकूर बशीर शेख (29) याला अटक केली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय आरोपी शकूर शेख याची पाच महिन्यांपूर्वी 26 ऑक्टोबर 2021 रोजी बीड जिल्ह्यातील इस्लामपुरा येथील यास्मिन (21) हिच्याशी लग्न झाले होते.
आरोपी शकूर हा मेकॅनिक आहे. लग्नानंतर काही दिवस त्यांनी यास्मिनची चांगली काळजी घेतली. मात्र त्यानंतर सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. सततच्या छळाला यास्मिन कंटाळली होती. ‘मला घेऊन जा,’ असे ती तिच्या वडिलांना म्हणायची.
तसेच 22 मार्च रोजी तिने वडिलांना फोन करून माहेरी नेण्याची विनंती केली होती, पण तिच्या वडिलांनी तिचे मन वळविले होते.
मात्र त्यानंतर अचानक गुरुवारी सकाळी शकूरने सासऱ्यांना फोन करून यास्मिन इमारतीवरून पडल्याचे सांगितले. विवाहितेच्या हत्येनंतर तिचे नातेवाईक पोलिस ठाण्यात जमा झाले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.