नांदेड, 25 मार्च : नांदेडमध्ये एका महिला डॉक्टरने लॉजमध्ये आत्महत्या केली. संबंधित महिला डॉक्टर गेल्या दोन दिवसांपासून याच लॉजमध्ये राहत होती.
घटनेच्या दिवशी महिला डॉक्टरने बराच वेळ खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे लॉज व्यवस्थापकाला संशय आला. त्यानंतर त्यांनी वजिराबाद पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा तपास सुरू आहे.
विद्या अमोल सुंकवाड असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. ती नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्या हिने २२ मार्च रोजी नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात पंजाब लॉजमध्ये रूम बुक केली होती.
23 मार्च रोजी सकाळी ती उठून बाहेर गेली, मग ती परत तिच्या खोलीत आली. मात्र 24 मार्चच्या सकाळी बराच वेळ झाला तरी त्या रूमबाहेर आल्या नाहीत.
लॉजच्या व्यवस्थापकाने दरवाजा ठोठावला आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने व्यवस्थापकाने पुन्हा दरवाजा ठोठावला आणि महिला डॉक्टरला उठवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतरही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर संशय आल्याने व्यवस्थापकाने वजिराबाद पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत आढळून आले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू आहे.
विद्या सुंकवाड यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आत्महत्येचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.