चीनसह काही देशात पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, भारतातही चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्सची आज बैठक होणार आहे.
आज बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कोरोनाची चौथी लाट कशी रोखता येईल, उपाययोजना काय करायला हव्यात आदींबाबत चर्चा केली जाणार असल्याचं, टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक यांनी सांगितलं.
****
आज फाल्गुन वद्य तृतीया अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. पुण्यातल्या श्री शिवनेरी स्मारक समितीतर्फे आज शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जात आहे.
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिवाजी पार्कवर शिवजयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्रासह देशाच्या पाच राज्यात २३ कार्यालयं आणि सुमारे सहा हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या बांधकाम क्षेत्रातल्या एका नवउद्यम कंपनीच्या पुणे आणि ठाणे कार्यालयांवर काल आयकर विभागानं छापे टाकले.
यावेळी सुमारे १ कोटी रुपयांची रोकड, २२ लाखांचे दागिने, तसंच मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि संगणकीय डाटा जप्त करण्यात आला.
ही नवउद्यम कंपनी बनावट शेल कंपन्याद्वारे नफेखोरी, हवाला रॅकेट, परदेशी चलनांचा गैरव्यवहार, करचुकवेगिरी इत्यादी गुन्ह्यात सहभागी असल्याचं सदर कागदपत्रांच्या पडताळणीतून स्पष्ट होतंय, असं आयकर विभागानं एका प्रसिद्धी पत्राकाद्वारे कळवलं आहे.
****
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
भाजपने या जागेसाठी सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणुकासाठी येत्या १२ एप्रिल रोजी मतदान होणार असून १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
****
मराठवाड्यात काल सहा नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात तीन, तर औरंगाबाद, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली. नांदेड, लातूर, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमे अंतर्गत आज सकाळपर्यंत १८१ कोटी ११ लाख ९८ हजार ९० मात्रा देण्यात आल्या. देशात आज सकाळपासून २१ हजार २९४ कोविड लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
१२ ते १४ वयोगटातल्या १६ लाख ७६ हजारांहून अधिक मुलांनी आतापर्यंत लसीची मात्रा घेतली आहे. तर दोन कोटी १७ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
दरम्यान, देशात काल नव्या एक हजार सातशे कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर तीन हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत चार कोटी २४ लाखांहून अधिक रुग्ण संसर्गमुक्त झाले असून, सध्या २६ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १८३ कोटी ५२ लाखांहून अधिक कोविड लसी विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या आहेत.राज्यांकडे अजूनपर्यंत १७ कोटी मात्रा शिल्लक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.