कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन करीत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा.
कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
• आमदारांचा स्थानिक विकास निधी पाच कोटी रूपये करण्याची अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
• परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
• बीड जिल्ह्यात मांजरा नदीवरील ब्रीज-कम-बंधाऱ्याच्या कामासाठी तांत्रिक मान्यता नाही- नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचं स्पष्टीकरण
• १२ ते १४ वर्ष वयोगटाकरताची कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू
• राज्यात कोविड संसर्गाचे २३७ तर मराठवाड्यात ९ नवे रुग्ण
• सहकार चळवळीतले जेष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पार्थिवावर कोपरगाव इथं अंत्यसंस्कार
आणि
• महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, इंग्लंडचा भारतावर चार गडी राखून विजय
आमदारांचा स्थानिक विकास निधी पाच कोटी रूपये करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यापूर्वी हा निधी चार कोटी रुपये इतका होता. राज्यातली सोळा टक्के जनता मुंबई महानगर प्रदेशात राहते, मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असल्यानं विकासासाठी निधी वाढवून देण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.
ग्रामीण भागात देखील जिल्हा नियोजनामध्ये निधी वाढवून देण्याची गरज आहे. या शिवाय चार आकांक्षीत जिल्ह्यामध्ये देखील मागास भागांच्या मानव विकास निर्देशांकांच्या प्रमाणात वाढीव निधी दिला जात असल्याची माहिती पवार यांनी दिली.
अर्थसंकल्पात घेतलेल्या, प्रत्येक निर्णय आणि केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सर्वशक्तीनिशी केली जाणार असल्याची ग्वाही, पवार यांनी यावेळी दिली.
राज्यात कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेताना, निधीवाटपाच्या सूत्रानुसार विदर्भासाठी तीन टक्के अधिकच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मराठवाड्यासाठी निधीवाटपाच्या सूत्राचं तंतोतंत पालन करण्यात आल्याचं ते म्हणाले.
राज्यातल्या निराधार आणि बेघर बालकांना आता वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात राहता येईल. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल विधान सभेत ही माहिती दिली. असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे.
राज्यात सध्या ३२६ बालगृहे कार्यरत असून, महानगरपालिका क्षेत्रात बालकांसाठी ४३ खुली निवारागृहं आहेत. बाल संगोपन गृहांची संख्या वाढवण्यात येणार असून, त्यासाठी ११ कोटी ४३ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.
राज्यात सर्व अंगणवाड्यांसाठी सुसज्ज जागा आणि सर्व सुविधा देण्यासाठी जलदकृती कार्यक्रम राबवून ही कामं एका वर्षात पूर्ण करण्यात येतील, असंही ठाकूर यांनी सांगितलं.
ज्या शाळांमध्ये परीक्षेत कॉपी पुरवत असल्याची प्रकरणं आढळतील त्या शाळांची मान्यता यापुढे रद्द करण्यात येईल, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानपरिषदेत जाहीर केलं.
प्रश्नपत्रिका व्हॉट्स अपवर व्हायरल झाल्याची त्याचप्रमाणे कॉपी पुरवल्याबाबतचं वृत्त प्रसारित झाल्यासंदर्भातला मुद्दा काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या निलजगाव इथल्या लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले आहेत. या शाळेत दहावीच्या परिक्षेला शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली.
येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत दिली. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं असून, या बदल्यांमधून डोंगरी भागात शिक्षकांची नियुक्ती केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात दोन लाख २७ हजार ५९१ शिक्षकांची पदं रिक्त असून, बदल्यांच्या निकषातील तफावत दूर करण्यासाठी, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती, मुश्रीफ यांनी दिली.
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा नगरपंचायत हद्दीत मांजरा नदीवरील ब्रीज-कम-बंधाऱ्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणतीही तांत्रिक मान्यता दिलेली नसल्याचं, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं.
या संदर्भात संबंधितांनी बनावट तांत्रिक मान्यता मिळवल्याचं निदर्शनास आलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आष्टी आणि पाटोदा या नगरपरिषदांच्या कामकाजात काही अनियमितता होत असल्याचं आढळून आल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जाईल, असंही राज्यमंत्री तनपुरे म्हणाले.
फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी आणि गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालिन प्रमुख रश्मी शुक्ला यांचा काल कुलाबा पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला. फोन टॅपिंग आणि बदली घोटाळा उघड झाला तेव्हा शुक्ला या पुण्याच्या पोलिस आयुक्त होत्या.
१२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम कालपासून सुरु झाली. सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर या वयोगटातल्या लाभार्थ्यांना कार्बोवॅक्स ही लस मोफत दिली जाणार असून, या लसीकरणासाठी १५ मार्च २००८ ते १५ मार्च २०१० या कालावधीत जन्मलेली मुलं पात्र आहेत. लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रांवर जाऊनही नाव नोंदणी करून लस घेता येईल.
औरंगाबाद शहरात मयुरबन कॉलनीतल्या प्रियदर्शनी विद्यालय इथं महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
परभणीत मनपा आरोग्य केंद्रात आयुक्त देविदास पवार यांच्या उपस्थितीत या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २३७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७१ हजार ८०३ झाली आहे. काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४३ हजार ७५९ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ४५५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २१ हजार ९६५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०९ शतांश टक्के आहे. राज्यात सध्या २ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मराठवाड्यात काल नऊ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात चार, औरंगाबाद दोन, तर नांदेड, बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली. उस्मानाबाद, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
हिंगोली जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही. जिल्ह्यात एकाच रूग्णावर उपचार सुरू होते, तो रुग्णही बरा झाल्यानं, जिल्ह्यात कोविडचा एकही सक्रीय रुग्ण नाही.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवीन रूग्ण आढळला नसल्यानं, हिंगोली जिल्हा कोविडमुक्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
होळीचा सण आज साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होळीच्या सणाच्या शुभेच्छा देताना, वृक्षतोड होणार नाही, याची काळजी घेत, पर्यावरणपूरक पद्धतीनं होळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उद्या साजरी होणारी धुळवडही नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदात साजरी करूया, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी होळीच्या शुभेच्छा देताना, समाजातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घ्यावं, तसंच वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. रात्री दहा वाजेच्या आत होळी प्रज्लवित करावी, डीजेचा वापर करू नये, असं या आदेशात म्हटलं आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बिभत्स वर्तन केल्यास कारवाईचे निर्देश गृह विभागानं दिले आहे.
कोविडचा प्रादुर्भाव अजुनही असल्यानं मास्कचा वापर, सामाजिक अंतराचा नियम पाळणं गरजेचं आहे. राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यानं लाऊड स्पीकर लावू नये अशी देखील सूचना देण्यात आली आहे.
सहकार चळवळीतले जेष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पार्थिवावर काल अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हे यांचं काल अहमदनगर इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते.
विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आणि २० लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्यानं काल गडचिरोली इथं पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. दीपक उर्फ मुंशी रामसू इष्टाम आणि शामबत्ती नेवरु आलाम अशी या नक्षली दाम्पत्याची नावं आहेत.
आत्मसमर्पण केल्यामुळे या दोघांना एकूण १० लाख रुपयांची मदत शासनाकडून केली जाणार असून, अन्य योजनांचाही लाभ देण्यात येईल, असं पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी सांगितलं.
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, माउंट मौनगानुई इथं काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा चार गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ ३७ व्या षटकात १३४ धावांवर तंबूत परतला.
सलामीवीर स्मृती मंधानानं सर्वाधिक ३५ तर रिचा घोषनं ३३ धावा केल्या. इंग्लंडनं ३२ व्या षटकात ६ बाद १३६ धावा करत विजयी लक्ष्य पार केलं. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पुढचा सामना येत्या शनिवारी ऑस्ट्रेलिया महिला संघासोबत होणार आहे.
विविध विकासकामांसाठी लातूर शहर महानगरपालिकेनं पाठवलेल्या ६८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे शहरातल्या विकासकामांचा अनुशेष भरून निघणार आहे.
हा निधी मंजूर केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राज्य शासनासह पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.
परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या घरगुती वीज देयकाची ४० कोटी रुपये थकबाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणनं वसुलीमोहीम सुरू केली आहे. गावा गावात जाऊन, थकबाकी भरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शहरासह तालुक्यात एक कोटी २२ लाख रुपये थकबाकी वसूल झाली असून ४० गावांतल्या घरगुती ग्राहकांची वीज खंडीत करण्यात आली.
दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता आणि इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या कारवाईमुळे नागरिकांतून संताप व्यक्त व्यक्त होत आहे.
प्लॉटची नोंद नमुना क्रमांक आठ वर घेण्यासाठी ९ हजार रूपयांची रक्कम घेतांना, परभणी तालुक्यातल्या पारवा सज्जावर कार्यरत ग्रामसेवक अनिल खिल्लारे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल सापळा रचून ताब्यात घेतलं.
खिल्लारे याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.