बीड : राज्यभरात काल (दि.18 मार्च) धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली.
आगर नांदूर येथील एका तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेटस टाकून आत्महत्या केली आहे. नितीन निर्मळ (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
नितीनने मिस यू माय फ्रेंड, बाय, शेवट, गुड बाय माय जिगरी आणि सॉरी असे स्टेटस ठेवले आणि आत्महत्या केली.
त्याच्या काही मित्रांनी नितीनची स्टेटस पाहिले आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र मित्रांनी शोध घेईपर्यंत नितीनने गावाजवळील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. नितीनने काल सकाळी धुळवड साजरी केली आणि दुपारी अचानक मिस यू माय फ्रेंड, बाय, गुडबाय माय जिगरी आणि शेवट असे स्टेटस त्याच्या Whatsapp वर टाकले.
त्यानंतर नितीनच्या काही मित्रांनी त्याचे व्हॉट्सअप स्टेटस पाहून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर मित्र आणि नातेवाईकांनी नितीनचा शोध घ्यायला सुरूवात केली.
काही वेळाने त्यांचा मृतदेह गावाजवळील गायराणा येथे लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, नितीनने व्हॉट्सअपवर असे स्टेटस का टाकले आणि त्याने आत्महत्या का केली, याचा तपास आता पोलिस करत आहेत. या घटनेने मात्र गावात शोककळा पसरली आहे.
बीडच्या माजलगावमध्ये गेल्या महिन्यात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या केली होती. दरम्यान नैराश्येतून तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांमध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे. माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी या तीन घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.