Statue of Knowledge in Latur | स्टॅच्यू ऑफ नॉलेजचे लातुरात नेत्रदीपक अनावरण

Statue of Knowledge in Latur | Spectacular unveiling of the Statue of Knowledge in Latur

Statue of Knowledge in Latur | विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७२ फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेजचा नेत्रदीपक अनावरण सोहळा दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर पार पडला. हा भव्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भीम अनुयायी पार्कवर उपस्थित होते.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर गेल्या २८ दिवसांपासून ७२ फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेजचे काम सुरू होते. या स्टॅच्यू ऑफ नॉलेजचा अनावरण सोहळा बुधवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी भन्ते पय्यानंद, भन्ते नागरसेन, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष नवनाथ आल्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७२ फुटी पुतळ्याच्या अनावरणाच्या ऐतिहासिक सोहळयाचा साक्षीदार होण्याची संधी मला खासदार सुधाकर शृंगारे यांच्यामुळे मिळाली.

दीक्षाभूमीच्या विकासासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. २३ कोटी रुपयांची इंदू मिलची जागा तीन दिवसांत घेतली आणि या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याच्या कामाला सुरुवात केली.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा जातीयवाद आणि विषमतेविरुद्ध होता. गोरगरिबांच्या न्यायासाठी त्यांनी लढा दिला. तीच प्रेरणा घेऊन आपण आयुष्यभर जनसेवेत कार्यरत आहोत, असे सांगितले.

यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात ७२ फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेजची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती देऊन हे ऐतिहासिक काम करण्याचे भाग्य मिळाल्याचे नमूद केले.

लेझर शो व नेत्रदीपक आतषबाजी

७२ फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या अनावरण सोहळ्यानंतर लेझर शो आणि नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. मनमोहक आतषबाजी पाहण्यासाठी हजारो अनुयायी डॉ. आंंबेडकर पार्कवर उपस्थित होते.

खासदारांचा तक्रारीचा सूर

प्रास्ताविकात खा. सुधाकर शृंगारे यांनी मी खासदार असलो तरी लातूर जिल्ह्यातील अधिकारी माझे ऐकत नाहीत, असा तक्रारीचा सूर लावला.

त्यानंतर हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जर अधिकारी ऐकत नसतील तर हा एका लोकप्रतिनिधीचा अवमान आहे, अशा अधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली जाईल, असा इशारा दिला.