वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Scientists should make the country a world leader through agricultural revolution - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे. एकेकाळी इतर देशातून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात करावा लागणारा आपला देश आज अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे. हरित क्रांती व श्वेत क्रांती नंतर आज नील क्रांतीच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरु आहे.

कृषी वैज्ञानिक व कृषी विद्यापीठांनी यापुढे संशोधन कार्य वाढवावे व देशाला जगद्गुरू बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 24 वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या व्हर्चुअल उपस्थितीत आज झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केल्याबद्दल देश कृषी विद्यापीठांचे योगदान कधीही विसरणार नाही, असे सांगताना संकटात असलेल्या देशांना देखील अन्नधान्य पुरविण्याची क्षमता देशाला प्रदान केल्याबद्दल राज्यपालांनी कृषी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.

परभणी येथील कृषी विद्यापीठाला भेट दिली त्यावेळी विद्यापीठाने विकसित केलेले रोबो तंत्रज्ञान, ड्रोन तसेच विविध वाणांच्या विकासाचे कार्य पाहिले.

कृषी स्नातकांनी प्रशासकीय सेवेत जाण्याऐवजी आपल्या क्षेत्रातच अर्जित ज्ञानाचा उपयोग करावा असे आवाहन करताना जगभरात कृषी, दुग्ध व्यवसाय आदी क्षेत्रातील कृषी तज्ज्ञांची मोठी मागणी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखीय अध्ययनास चालना देण्यात आली असल्याचे सांगताना कृषी स्नातकांनी आपल्या आवडीच्या इतर विषयांचे देखील ज्ञान ग्रहण करून आपले व्यक्तिमत्व विविधांगी घडवावे असे त्यांनी सांगितले.