हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार : सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख  

The final round of Diamond Jubilee State Drama Competition will be held in Kolhapur: Cultural Affairs Minister Amit Deshmukh

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी हीरक महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित होणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज केली.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनांक ६ मे रोजी १०० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताचे औचित्य साधून कोल्हापूर येथे या स्पर्धा घ्याव्यात अशी मागणी कोल्हापूरकरांनी केली होती.

संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतींना नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य व राजर्षी शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी या निमित्ताने कोल्हापूर मधील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दिनांक ६ मे २०२२ पासून हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी दिली.

यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या १९ केंद्रांवरील प्राथमिक फेरीत ३५६ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता.

यापैकी प्राथमिक फेरीतील ३४ नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या संस्था, कलाकार व तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी प्रयोग सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.