Lumpy Virus : लंपी विषाणूचा धोका वाढतोय, गाईचे दूध पिणाऱ्यांनाही धोका आहे का? कोविड सारखे माणसांसाठी धोकादायक आहे का?

Risk of lumpy virus on the rise, are cow's milk drinkers at risk?

Lumpy Virus Skin Disease Causes and Prevention : देशात लंपी व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. या त्वचारोगाचा प्रादुर्भाव जनावरांना होत आहे. आतापर्यंत 10 हून अधिक राज्यांमध्ये त्याची प्रकरणे समोर आली आहेत.

लंपीचं सर्वात भयंकर रूप राजस्थानमध्ये पाहायला मिळत आहे. या विषाणूमुळे राज्यात 55 हजारांहून अधिक गुरांचा मृत्यू झाला आहे. याला रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारे पावले उचलत आहेत.

मात्र या आजाराने जीव गमावणाऱ्या गुरांची संख्या सातत्याने वाढत आहे. राजस्थान सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून लंपी रोगाला महामारी म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. अनेक राज्यांमध्ये या आजाराची वाढती प्रकरणे आता मोठ्या धोक्याकडे बोट दाखवत आहेत.

लंपी त्वचेच्या आजाराची सर्वाधिक प्रकरणे गायींमध्ये आढळून येत आहेत. हा रोग गायींना झपाट्याने संक्रमित करत आहे आणि त्यांच्या मृत्यूस कारणीभूत आहे.

लंपी रोग हळूहळू साथीच्या रोगासारखा पसरत आहे. बारकाईने पाहिले तर याची लागण झालेल्या 8 ते 10 टक्के गायी मरत आहेत. एका प्राण्याला या आजाराची लागण होत असेल तर दुसरा प्राणीही त्याला बळी पडत आहे.

संक्रमित गाय किंवा गुरांच्या शरीरावर जखमेवर बसलेली माशी, डासाच्या माध्यमातून एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यामध्ये लंपीचा प्रादुर्भाव होत आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रकरणे पाहता केंद्र आणि राज्य सरकार या विषाणूला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लम्पीने दिल्लीतही उपद्रव द्यायला सुरुवात केली आहे. राजधानीत या आजाराचे 173 रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारही सतर्कतेच्या मार्गावर आले आहे. दरम्यान, लंपीच्या भीतीने राजस्थान आणि पंजाबमधील काही भागात दुधाचा वापर कमी झाला आहे. या विषाणूच्या भीतीने ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनी दूध पिणे बंद केले आहे.

काही शहरी भागातही डेअरींमधून दूध आणि तुपाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. गाईचे दूध प्यायल्याने या आजाराची लागण होऊ शकते, असे लोकांना वाटत आहे.

विशेषत: लहान मुलांच्या पालकांना याची खूप काळजी वाटते. सामान्य लोक लंपी व्हायरस कोविडशी जोडून पाहत आहेत. राजस्थानच्या अनेक ग्रामीण भागात लंपी रोगाची भीती आहे. बाधित गायींच्या भीतीमुळे दुधाचा वापरही कमी झाला आहे.

लंपी व्हायरसची लक्षणे

  1. गाय किंवा म्हशीचे वजन झपाट्याने कमी होते
  2. गाय किंवा म्हशीच्या दूध उत्पादक क्षमतेवर परिणाम
  3. शरीरावर 10-50 मिमी गोल गाठी येतात
  4. या विषाणूमुळे जनावरांना खूप ताप येतो
  5. चघळण्यास आणि गिळण्यास त्रास होत असल्याने खाणे बंद होते
  6. प्राण्यांमध्ये वंध्यत्व आणि गर्भपाताची समस्या

आपल्या आजूबाजूच्या गायींमध्येही अशी लक्षणे दिसल्यास त्याची त्वरित माहिती आरोग्य विभागाला द्यावी. ही लक्षणे 5 आठवड्यांपर्यंत टिकून राहतात आणि योग्य उपचार न मिळाल्यास गायींचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, गायीला योग्य वेळी अलग ठेवल्यास या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

गायीचे दूध प्यायल्याने माणसांनाही संसर्ग होईल का?

संक्रमित गायीचे दूध प्यायल्याने मुलांना किंवा प्रौढांनाही या विषाणूची लागण होऊ शकते का? या संदर्भात आरोग्य विभाग व पशुरोग तज्ञ सांगतात की, लोक सहसा सर्व घरांमध्ये गायीचे दूध उकळून पितात.

दूध उकळल्याने त्यातील धोकादायक जीवाणू किंवा विषाणू नष्ट होतात, अशा स्थितीत लोकांनी गायीचे दूध उकळून प्यायल्यास यापासून धोका होण्याची शक्यता नाही.

कोणत्याही परिस्थितीत दूध न उकळता प्यायल्यास ते मुलाच्या किंवा व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका नाही.

ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यात संसर्ग झाला तरी तो आजार होत नाही. त्याच वेळी, विषाणूचा प्रादुर्भाव कमी असला तरीही, संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे.

कोणत्याही विषाणूचा धोका तेव्हाच असतो जेव्हा रोगप्रतिकारशक्ती चांगली नसते, जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही.

या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या भागात राहणाऱ्या लोकांना लंपीपासून घाबरण्याची गरज नाही. संक्रमित गायीचे किंवा इतर कोणत्याही गायीचे दूध प्यायल्याने हा विषाणू माणसात पसरतो असे नाही. आतापर्यंत हा रोग मानवांना संक्रमित करेल असा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही.

हा विषाणू कसा टाळता येईल

या विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतींबाबत नामवंत पशुरोग तज्ञ डॉ. अनिल भिकाने सांगतात की, या विषाणूपासून बचाव करण्यासाठी गायी राहत असलेल्या परिसरात जैव-सुरक्षा उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

तुमच्या गायींमध्ये लंपी असल्याची लक्षणे तपासत राहा. गायीमध्ये लंपी विषाणूची लक्षणे दिसल्यास गायीला चारा, पाणी व उपचार देऊन कळपापासून वेगळे ठेवावे आणि लागण झालेल्या गाईची त्वरित माहिती आरोग्य विभागाला द्यावी.

गाउट पॉक्स आणि शीप पॉक्सची लस लंपी व्हायरसपासून बचाव करण्यासाठी खूप मदत करू शकते, ही लस 60 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.

या परिस्थितीत सर्व बाधित भागात या लसीकरणासह गुरांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. यासोबतच या विषाणूबाबत लोकांना जागरूक करण्याचीही गरज आहे. शेतकरी व नागरिकांनी न घाबरता जागरूक रहावे असे आवाहन डॉ.अनिल भिकाने यांनी केले आहे.

लक्षणे ओळखण्यासाठी जागरुकता आणावी लागेल

अनेक भागात लंपी या लक्षणांबाबत जागरूकतेचा अभाव आहे. या आजाराबद्दल लोकांनी घाबरू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गाईच्या अंगावर लंपी निघत असल्यास किंवा जखमा असल्यास तत्काळ आरोग्य विभागाला कळवावे. गाईला योग्य वेळी विलग करून इतर गुरांना या संसर्गाच्या धोक्यापासून वाचवता येते.

लंपी व्हायरस उपचार

लंपी विषाणूची लागण झालेले प्राणी दोन ते तीन आठवड्यांत स्वतःच बरे होतात. परंतु जलद रिकवरीसाठी त्यांना एंटी-बायोटिक दिले जाऊ शकतात. त्याची लस (Lumpy Pro-Vac-End) गेल्या आठवड्यातच लाँच झाली आहे.

या लसीच्या यशाचे प्रमाण 100 टक्के असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, व्हायरसपासून बचाव करण्यासाठी इतर काही गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे.

संसर्ग झालेल्या प्राण्यांना इतर प्राण्यांपासून वेगळे ठेवा. त्यांची राहण्याची जागा स्वच्छ ठेवा, गोठ्यात किंवा विलगीकरण केलेल्या ठिकाणी माश्या, डास, कीटक, पतंग यापासून मुक्त असावीत. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.