मंगळुरूतील मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले; विहिंप-बजरंग दल आक्रमक, कलम 144 लागू

मंगळुरू : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या तापलेला असतानाच कर्नाटकातील जुमा मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने या भागात कलम 144 लागू करण्यात आले असून पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

मंगळुरूपासून काही अंतरावर मलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचे काम सुरू आहे. 21 एप्रिल रोजी डागडुजीदरम्यान मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले.

हे अवशेष सापडल्यामुळे पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर होते, असा दावा केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात धाव घेतली असून, कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय या ठिकाणचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली.

हा वाद न्यायालयामध्ये पोहोचला असून न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत डागडुगीचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले आहे.

आज हिंदू संघटनांकडून रामांजनेय भजना मंदिरामध्ये धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी मोठ्या संख्येने हिंदू बांधव जमा झाला होता.

त्यामुळे मशिद आजूबाजूच्या परिसरामध्ये कमल 144 लागू करण्यात आले होते आणि नागरिकांनी शांतता राखावे असे आवाहन पोलिसांनी केले.

याबाबत अधिक माहिती देताना मंगळुरूचे पोलीस आयुक्त एन. एस. कुमार यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात असून शहरामध्ये शांतता आहे.

हिंदू संघटनेने आज सकाळी साडे आठ वाजता मंदिरामध्ये एका विधीचे आयोजन केले होते. हा विधी अकरा वाजेपर्यंत चालला.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी आवश्यक तेथे फौजफाटा तैनात करण्यात आला असून ग्रामस्थांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले असून दोन्ही पक्षांनी पुढील लढा न्यायालयात लढण्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्वेची मागणी

दरम्यान, विहिंप आणि बजरंग दलाच्या मागणीनंतर प्रशासनाने तातडीने या जमिनीसंदर्भातील कागदोपत्री पडताळणी सुरू केली असून लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

जमिनीची नोंद ठेवणारा विभाग आणि वफ्फ बोर्डाकडून माहिती घेणार आहोत, असे दक्षिण कानडाचे उपायुक्त राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले.