बीड : औंढा नागनाथ ते शिरड शहापूर मार्गावर काठोडा पाटीजवळ टेम्पो-दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.
शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. भुजंग सिताराम मोरे असे मृत व्यक्तिचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनूरी तालुक्यातील बोल्डावाडी येथील भुजंग मोरे हे त्यांच्या दुचाकी वाहनावर आज सकाळी औंढा नागनाथ येथे आले होते.
औंढा येथील काम आटोपून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिरड शहापूर मार्गे परत गावाकडे निघाले होते. यावेळी औंढा नागनाथ ते शिरड शहापूर मार्गावर काठोडा पाटीजवळ शिरड येथून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली.
या अपघातात भुजंग मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पो जागेवरच सोडून पळ काढला आहे.
अपघाताची माहिती मिळताच कुरूंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक नितीन केणेकर, जमादार बंडू घुगे, गजानन भोपे, ज्ञानेश्वर ठोंबरे, वसमतकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.