तिरुपती : तिरुपती येथील चेकपोस्टवर त्यांच्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने त्यांना थांबवण्यात आल्याचा आरोप एका नागरिकाने केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ सुरेश गावंडे पाटील यांचा आहे. तिरुपतीहून येथून तिरुमला येथे बालाजीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांची गाडी चेकपोस्टवर थांबवली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गाडीतून हटवण्यास सांगितल्याचा आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता तिरुमला तिरुपती देवस्थानने स्पष्टीकरण दिले आहे.
सुरेश गावंडे पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही पोस्ट शुक्रवारची आहे. तिरुपतीहून तिरुमला येथे जात असताना चेकपोस्टवर त्यांची गाडी तपासण्यात आली.
त्यांनी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गाडीतून काढण्यास सांगितले. गाडीतील मूर्ती न काढल्यास गाडी वर नेऊ शकत नाही, असे तेथील अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना असे न करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिल्याचा आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे.
ज्या राज्यात आपल्या छत्रपतींचे मंदिर आहे. त्याच राज्यात छत्रपतींची मूर्ती गाडीत आहे म्हणून तिरुमलाला परवानगी नाही, असा मी जाहीर निषेध करतो.
गाडी पार्क करून त्यांना बसने जाणे योग्य वाटले नाही. यामुळे आपण पुढचा प्रवास चालू केला, असा आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे. तिरुपती येथील टोल नाक्याचे २७० रुपये दिल्याचेही त्यांनी शेअर केले आहे.
तिरुमला संस्थानने दिलेले स्पष्टीकरण
सुरेश पाटील यांचा व्हिडिओ आणि फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी तिरुमला तिरुपती संस्थानकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
तिरुपतीला भेट देणाऱ्या भाविकांना त्यांच्या वाहनात तिरुमालाची मूर्ती, छायाचित्रे, राजकीय पक्षांचे ध्वज, चिन्हे, मूर्तीपूजेचे साहित्य नेण्यास मनाई आहे, असे संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयाने स्पष्ट केले आहे.