मुंबई : राज्याच्या राजकारणात नेमके काय होईल, याची काहीही खात्री उरलेली नाही. कारण गेल्या साडेतीन महिन्यांतील घटना तेच सांगत आहेत. सध्या शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडेल, असा दावा भाजप नेते करत आहेत.
तसेच, शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दावा केला की, काँग्रेस पक्षातील तब्बल 22 आमदार फुटतील, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, तेव्हा तयार रहा अशी सूचना केली आहे.
त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या सूचनांवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे.
मध्यावधी निवडणुकांसाठी युद्ध की नैसर्गिक आपत्ती काही आलीय का? मध्यावधी निवडणुका कशासाठी? काय कारण असावे! राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्यावे.
त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याने मध्यावधी निवडणुका होणार आहेत का? पण तसे होत नाही. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे मला वाटत देखील नाही.
कारण त्यांनी अभ्यासपूर्ण किंवा वैचारिक पद्धतीने सूचना दिल्या नाहीत. घरी बसून काहीही बोलतात, बोलू शकतात, त्यांनी घराबाहेर पडून बोलावे, असे नारायण राणे म्हणाले.
ऋतुजा लटके यांच्यावर राणेंची टीका
दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत नारायण राणे यांना विचारण्यात आले. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित आहे. त्यामुळे लटके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यांच्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले.
“आधी विजयी व्हा, विजयी असा शिक्कामोर्तब होऊ द्या, मग बोला. त्यांना अजून काय बोलावे ते कळेना. आधी पाठिंबा देऊन भाजपची मते कोणाला पडली हे आम्ही स्पष्ट केले आहे.
आम्ही अधेमधे लटकत नाही. आमचा निर्णय पक्का आहे. पोटनिवडणुकीकडे आम्ही गांभीर्याने पाहिली नाही. कारण सर्वच पक्षांनी लटके यांना साथ दिली,’ अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.
अजित पवारांची नाराजी फडणवीसांना कळेल
अजित पवार काल शिर्डीतील राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराला अनुपस्थित होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत नारायण राणेंना प्रश्न विचारला असता अजित पवारांची नाराजी मला कशी कळणार? असा प्रतिप्रश्न करण्यात केला.
तसेच अजित पवारांची नाराजी त्यांच्या जवळची आहे, त्यांना कळते. आमचे देवेंद्र फडणवीस यांना जास्त कळते. त्यांना विचारून सांगतो, अशी त्यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली.