नवी दिल्ली : गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.
त्यानंतर पुढील वर्षी अनेक राज्यांत निवडणुका आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे.
गेल्या 3 वर्षात चांगली कामगिरी करणारे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दुसरी टर्म मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.
जुलै 2019 मध्ये नड्डा यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी 20 जानेवारी 2020 रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपणार आहे.
परंतु नड्डा यांना दुसरी टर्म मिळण्याची शक्यता आहे. नड्डा यांच्या आधी भाजपचे अध्यक्षपद अमित शहा यांच्याकडे होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर शाह यांना केंद्रात गृहमंत्रीपद मिळाले. त्यानंतर नड्डा यांनी पक्षाचे नेतृत्व केले.
अध्यक्ष निवडीसाठी भाजपची वेगळी प्रक्रिया आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष निवडीची योजना असती तर ती प्रक्रिया गेल्या महिन्यात सुरू व्हायला हवी होती.
कारण पक्षाध्यक्ष निवडीसाठी निम्म्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका घ्याव्या लागतात, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे नड्डा यांना आणखी एक संधी मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
नड्डा यांची मागील अडीच वर्षांत कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. शहा यांच्यानंतर त्यांनी पक्षाची जबाबदारी चोखपणे हाताळली आहे.